१
शिवाजी महाराजांना आदर्श ठेवले तर त्यांनी हिंदुत्वाच्या रक्षणार्थ जे पराक्रम केले ते आठवतात. जितके सामर्थ्य भगव्या ध्वजाचे आहे, तितकेच शिवरायांचे आहे. जो इतिहास ध्वजाच्या दर्शनाने आठवतो आणि त्यापासून जी स्फूर्ति मिळते, तीच स्फूर्ति शिवरायांच्या चारित्र्यापासून मिळते.
२
संघाला फक्त हिंदूंचा हिंदुस्थान हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवायचे आहे. हिंदुस्थान हा देश हिंदूंचाच आहे. इतर राष्ट्रांप्रमाणे हे हिंदू लोकांचे राष्ट्र असून, या हिंदू राष्ट्रात हिंदू म्हणतील ती पूर्व दिशा असली पाहिजे. हेच संघ ओळखतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इतर गोष्टी जाणून घेण्याची जरुरी नाही.
३
संघाच्या महान जीवनकार्यावर आपली अढळ निष्ठा असू द्या. संघाचे ध्येय हृदयावर कोरून ठेवा. अखिल हिंदू समाजात आपल्याला नवचैतन्य आणि निर्भयता उत्पन्न करावयाची आहे. सामाजिक बल उत्पन्न करून समाजघटकांत स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवावयाचा आहे.
४
भगवंताचा आम्हाला आशीर्वाद आहे अशी आमची खात्री आहे. आमचे कार्य आक्रमणाचे नसून शांततेचे व संघटनेचे आहे. हिंदू धर्म व हिंदू संस्कृती याकरिता हे पवित्र कार्य केले पाहिजे व आपली उज्ज्वल संस्कृती राखली पाहिजे व वृद्धिंगत केली पाहिजे. तरच या सुधारलेल्या जगात आपला व आपल्या समाजाचा निभाव लागेल.
५
आपला संघ परमेश्वराच्या कृपादृष्टीला सदैव पात्र झाला आहे व होत राहील असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण आपल्या अंतःकरणातील भावना परमेश्वराला कळतात. आपले अंतःकरण पवित्र व शुद्ध आहे. त्यात पापाचा अंशदेखील नाही.
६
स्वयंसेवक, मग तो वयाने मोठा असो किंवा लहान असो, तो राष्ट्राचा जबाबदार घटक असतो. राष्ट्राच्या बाकीच्या घटकांवर जबाबदारी नाही, असे नाही. पण आपण संकल्पपूर्वक जबाबदारी घेऊन या संघात प्रवेश केला आहे म्हणून तुमची जबाबदारी अधिक आहे.
७
तत्वे हि आचरण्यात आणण्यासाठीच असतात, हे आपल्याला लोकांना पटवून द्यायचे आहे. संघाने उचललेली कार्यपद्धती हीच आम्हाला आमच्या ध्येयाप्रत पोचविणारी आहे, हे जनतेच्या निदर्शनास प्रत्यक्ष उदाहरणाने आणून द्यायचे आहे.
८
एवढी गोष्ट आपण सर्वांनी नेहमी लक्षात बाळगावी की, हे सामर्थ्य आपणां सर्वांच्या दररोज एके ठिकाणी जमण्यात आहे. जोपर्यंत आपण दररोज एके ठिकाणी जमून अंतःकरण मोकळे करून एकमेकांशी विचारविनिमय करीत रहाल तोपर्यंतच हे सामर्थ्य आपल्यात दृग्गोचर होईल.
९
संघटना ही राष्ट्राची प्रमुख शक्ती आहे. जगात कोणतेही प्रश्न सोडवावयाचे असतील तर ते सामर्थ्याच्याच जोरावर सुटतात. ज्या राष्ट्रात सामर्थ्य नसते, त्या राष्ट्राच्या मनातील कोणतीही इच्छा सफल होत नाही. पण सामर्थ्यशाली राष्ट्राला वाटेल त्यावेळी वाटेल ती गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे करता येते.
१०
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या बुटांना पॉलिश करण्यापासून, तो तेच बूट पायातून काढून त्यांचे डोके रक्तबंबाळ करीत मारण्यापर्यंत सर्व मार्ग माझी स्वातंत्र्यप्राप्तीची साधने होऊ शकतात. कोणत्याही मार्गाविषयी माझ्या मनात तिरस्काराचा भाव नाही . इंग्रजांना बाहेर हाकलून देश स्वतंत्र करणे एवढेच मला ठाऊक आहे.
११
स्वयंसेवकाची निष्ठा कोणत्याही एका व्यक्तीच्या ठिकाणी नको , माणसे येतात आणि जातात, माणसे स्खलनशील असतात,या भूमीचा अनादिकालापासूनचा इतिहास व येथे विकसित झालेल्या राष्ट्रीय संस्कृतिने शिकविलेली जीवनमूल्ये यांचे प्रतीक म्हणजे भगवा ध्वज, त्याचा यथोचित आदर आपण केला पाहिजे.
१२
आपण सर्वांनी राष्ट्रकार्याची फार मोठी जबाबदारी शिरावर घेतली आहे. आपल्या उच्च सिद्धांतांना आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणून दाखवू असे आपले म्हणणे आहे. आपली हि कार्यपद्धती आपणाला आपल्या ध्येयाप्रत अवश्य पोहोचविल अशी अटळ श्रद्धा आहे. त्यासाठी आपले विचार आपल्याला आपल्या वागणुकीतून प्रकट करता आले पाहिजेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा