शनिवार, १८ जुलै, २०२०

४० अनुशासन

                                         ४० अनुशासन 

           जर मनाला व्यवस्थितपणाचे वळण असेल तर शरीराकडून अनुचित व्यवहार होणार नाहीत. या दृष्टीने व्यक्तिगत आणि संघबद्ध जीवनात अनुशासनाचा गुण हृदयाच्या गाभ्यापर्यंत पोचविणे, मन अव्यवस्थित न ठेवणे आणि एकाग्रतेने काम करण्याची प्रवृत्ती राहणे या सर्वांचा अभ्यास करावा लागेल व करवून घ्यावा लागेल. 

२ 
     आम्ही जेव्हा हिंदू संघटनेचे ध्येय समोर ठेवून कार्यारंभ केला तेव्हा लोक म्हणाले की, हिंदू समाजात शिस्त बाणविणे, निस्वार्थ बुद्धी निर्माण करणे व खांद्याला खांदा मिळवून चालायची वृत्ती निर्माण करणे अशक्य आहे. परंतु संघाने सर्व प्रकारच्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा खांद्याला खांदा मिळवून, एका दिशेने, एका विचाराने, अनुशासनात चालणारे लाखो स्वयंसेवक हिंदू समाजात उभे केले. खायला मिळो वा न मिळो याची चिंता नाही. हिंदू समाज अनुशासनयुक्त निस्वार्थी व गुणसंपन्न होऊ शकतो हे आज संघाने सिद्ध करून दाखविले आहे.

         जेव्हा आपल्यापुढे एखाद्या ध्येयाचा अविर्भाव होतो तेव्हा आपल्या स्वातंत्र्याला लगाम लावला जातो आणि हा लगाम लावणारे असते ते आपले ध्येयच. जी गोष्ट ध्येयपूर्तीच्या आड येते ती सोडून द्यावी लागते. ती गोष्ट निषिद्ध बनते, आणि मग जीवनात कर्तव्य व अकर्तव्य यांचा गमतीशीर खेळ सुरू होतो. त्यानंतर ध्येयच आपल्या संपूर्ण जीवनाला नियंत्रित करणारे बनते. यालाच म्हणतात अनुशासनबद्ध जीवन.                               एकनाथजी रानडे

         सामर्थ्य संघटनेतून मिळते. तोच मनुष्य समुदाय संघटित-शक्तीच्या रूपात उभा राहू शकतो ज्यात सर्वांच्या समस्त मानसिक, बौद्धिक व शारीरिक शक्ती एकाच दिशेने काम करतात, अर्थात अनुशासनबद्ध असतात. जेव्हा एकाच उद्दिष्टावर सर्वांची मने केंद्रित होतात, बुद्धीचा निश्चय असतो, शरीराच्या सर्व क्रिया सुनियंत्रित आणि एक दुसरीशी जुळणाऱ्या असतात तेव्हाच शिस्तबद्ध जीवन निर्माण होते.                              प. पू. श्रीगुरुजी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा