९२ व्यक्तित्व समर्पण
१
हृदय जिंकणे, हृदयाशी हृदय भिडविणे आणि व्यक्तित्व पूर्णपणे विसरून जाणे म्हणजेच संघटना ! आम्ही अधिकाधिक विचार केला, तर ' व्यक्तीने राष्ट्ररूपाशी एकरूप होण्यातच राष्ट्राचे कल्याण आहे ' हे आमच्या लक्षात येईल. संकुचित व्यक्तित्व हेच आमच्या यातनांचे आणि अडचणींचे मूळ कारण आहे. व्यक्तित्वाचे विलीनीकरण म्हणजे मरण नव्हे, विकास आहे, असे मानले जाते. मग आपण व्यक्ती न राहता राष्ट्र बनून जातो. आपण जर संपूर्ण राष्ट्रासमवेत आनंदी किंवा दुःखी झालो तर मग आपला किती तरी मोठा विकास होईल. प. पू. श्रीगुरुजी
२
आता सर्व ऐषआराम तुच्छ आहेत असा विचार करून जीवनातील किमान आवश्यकतांचाच केवळ विचार करून, उरलेली सर्व शक्ती संघकार्यार्थ लावावी असा निश्चय करावा. वैयक्तिक जीवनात थोडी गैरव्यवस्था सोसावी लागली तरी संघकार्याची सुव्यवस्था दृढ करण्याचाच आपला संकल्प असला पाहिजे.
३
माणूस अगदी लहानपणापासून समाजापासून शिक्षित आणि संस्कारीत केला जातो. हळूहळू तो गुणमान बनतो. आपल्या ठायी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्याचा अवसर त्याला प्राप्त होतो. समाज त्याचा परोपरीने सांभाळ करतो. एखाद्या माणसाला बुद्धिवान, धैर्यवान, शक्तिमान, धनवान व पराक्रमी बनविण्याचे काम समाजच करतो. अशा रीतीने लहान मोठ्या सगळ्या गोष्टी समाजापासून घेऊन माणूस जेव्हा सामर्थ्यसंपन्न बनतो तेव्हा तो आपले स्वतंत्र कर्तृत्व दाखवितो. परंतु वृक्ष ज्याप्रमाणे आपली फळे आपणच खाल्ली असे करीत नाही त्याप्रमाणे हा थोर पुरुष आपली सगळी सत्कर्मे समाजाला अर्पण करतो. तो केवळ स्वतःचा विचार करीत नाही. तो सर्वांचा विचार करतो. जेव्हा व्यक्ती समाजाला अधिकाधिक समर्पित करते तेव्हा समाजही व्यक्तीच्या योगक्षेमाची चिंता वाहतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा