गुरुवार, २३ जुलै, २०२०

६६ संघकार्य

                                       ६६  संघकार्य 
                      
      हिंदू शब्दाला विरोध करणारेही जेव्हा या देशाचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच असतो. गेल्या दोनशे वर्षांत सामाजिक सुधारणा करण्याचे दृष्टीने झालेल्या चळवळींचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येईल की सर्व समाजसुधारकांसमोर हिंदू समाज होता. सामाजिक दोषांसंबंधी चर्चा परिसंवाद होतात त्यावेळी हिंदू समाजातील दोषांसंबंधीच बोलले जाते. म्हणून हिंदू समाज बलवान झाला पाहिजे. गेली शेकडो वर्षे होणारे परकीय हल्ले, मध्यंतरीचा गुलामगिरीचा काळ आणि योग्य नेतृत्वाचा अभाव यामुळे आपले समाज जीवन विस्कळीत होऊन त्यात दोष शिरले. हे सामाजिक दोष मान्य करण्यात संकोच बाळगण्याचे कारण नाही. हे सारे दोष निपटून काढण्याचा संघाचा प्रयत्न आहे. संघाचा प्रभाव जसा वाढेल तसतसा समाजातही या दृष्टीने अनुकूल बदल होत जाईल. म्हणून सर्व दृष्टीने संघकार्य वाढले पाहिजे.

        वैयक्तिक सुखाचा विचार न करता तरुणांनी आपल्या सर्व शक्तीनिशी या राष्ट्रउभारणीच्या थोर कार्याला वाहून घेण्याची गरज आहे. आपल्याला आपली उज्वल परंपरा माहीत आहे. १९३७ ते १९४७ च्या काळात १८-२० वर्षांचे बुद्धिमान, गुणसंपन्न तरूण अपरिचित प्रांतात गेले. अपरिचित घरात राहिले. त्यांची वये विकारसुलभ होती. परंतु एकांतवासात वा अरण्यांत न जाता समाजात राहून आणि कर्तव्याभिमुख जीवन जगून आपल्या चारित्र्याचा एक मानदंड त्यांनी उभा केला. त्या त्या प्रांतात संघकार्याची मजबूत पायाभरणी केली. आज अशाच हजारो तरुण कार्यकर्त्यांची गरज आहे. तसेच नोकरी व व्यवसाय यातून निवृत्त झालेल्या स्वयंसेवकांचा बराच मोठा वर्ग आहे. त्यांनी आपल्या घरादारांच्या जबाबदारीतून मोकळे होऊन एखाद्या प्रचारकासारखे विविध क्षेत्रातील सेवा कार्यांना वाहून घ्यावे.

        संघाचे कार्य परमेश्वरी आहे. जे चांगले ते परमेश्वर ! मंगलम् भगवान विष्णू: | हिंदू समाजाचे सर्वात चांगले उदात्त असेल त्याचे नाव संघ " यद् यद् विभूतीमत्सत्वं " तो परमेश्वराचा अंश असे गीतेत सांगितले आहे. जे उचित कार्य आहे ते परमेश्वरी कार्य होय. त्यात अहंकार, अविश्वास, अप्रामाणिपणा असावयाचा नाही. मानवाचे जीवन उदात्त करणे याचे नाव संघ. म्हणून संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करावयाचे. जीवनामध्ये माझी कोणती इच्छा असो संघाची सूचना, आज्ञा, विनंती काहीही म्हणा ते सर्वात प्रथम महत्त्वाचे शिरसावंद्य ! अशा मनोधारणेने काम करण्याचा निश्चय असला पाहिजे. प्रत्येकाने काम केले तरच संघ वाढणार. त्यासाठी आपले जीवन म्हणजे वेळ द्यावयाचा. - मा. बाबाराव भिडे

         जशी भगवान श्रीकृष्णाची दोन रूपे होती. एक लोणी खाणारा गोपाळकृष्ण, दुसरा जगाचा निर्माणकर्ता, पालनकर्ता व संहार करणारा विराटरुप कृष्ण परमात्मा. याच प्रकारे संघकार्याची ही दोन रुपे आहेत. एक संघस्थानावरील, जिथे स्वयंसेवकांवर संस्कार केले जातात, दुसरे विराट रूप, देशांतील कोणत्याही क्षेत्र असे नाही जेथे संघाचे वर्चस्व नाही. संघ म्हणजे समाज, या महान कल्पनेला साकार करण्यासाठी सर्व कामे आम्हास करावी लागतील.                                                                                    मा.  यादवराव जोशी

५  
       एकाच राष्ट्राच्या निरनिराळ्या पैलूंचे काम करणारे आपण परस्पर एक दुसऱ्यांशी जुळवून चालले पाहिजे. तसेच एक राष्ट्रीयत्वाची जाणीव आपल्या हृदयात जागृत ठेवली पाहिजे. भिन्न भिन्न कार्यक्रमातून आपल्याजवळ जे जे लोक येतात त्यांचेवर राष्ट्रभक्तीचा योग्य संस्कार करण्यासाठी त्यांना आपल्या संघकार्याकडे आकृष्ट करणे हा आपला धर्म आहे. लोकांचे मनात भावनेचा उद्रेक न होऊ देता कौशल्याने हळूहळू हे काम केले पाहिजे.            श्री गुरुजी

          आपण कर्मठ झाले पाहिजे. आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आपल्या पवित्र कार्याच्या योगाने संपूर्ण समाजाचे संघटन होईल. एक दिव्य, शक्तिशाली, सर्वगुणसंपन्न असे वैभवशाली राष्ट्र निर्माण होईल. ज्याची ज्योत जगभर प्रकाश पसरवून सुख शांती देईल. अशा तऱ्हेचा श्रेष्ठ भावं अंत:करणामध्ये धारण करून आपली संपूर्ण शक्ती आपल्या कार्यावर केंद्रित करावी हीच सर्वांकडून अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा