सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २४१

                        विवेकानंद अमृत २४१

     मूर्तीपूजा चूक आहे असे म्हणण्याची एक टूमच अलीकडे निघाली आहे . मूर्तीपूजेवर कोणी अशी उथळ टीका केली तरी त्यावर साधा ' ब्र ' न काढता सर्व लोक ती मुकाट्याने गिळतात . मलाही एकेकाळी मूर्तीपूजेचा असाच राग येत असे . पण ते पाप फेडण्यासाठी मूर्तीपुजेतूनच ज्याला अद्वैत साक्षात्कार झाला अशा एका माणसाच्या पायाशी बसून धडे घ्यावे लागले . तो माणूस म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस ! 

विवेकानंद अमृत २४०

                      विवेकानंद अमृत २४०

     मूर्तीपूजेतून जर असे रामकृष्ण परमहंस निर्माण होत असतील तर आपल्याला सुधारकांची जात हवी की मुर्तीपुजकांची या प्रश्नांचे उत्तर मला आपण द्यावे . मुर्तीपुजेतून श्रीरामकृष्ण परमहंस निर्माण होत असतील तर शेकडो मूर्ती येऊ द्या . अशी श्रेष्ठ माणसे ज्या मार्गाने निर्माण करता येत असतील त्या मार्गाने निर्माण करा . 

रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३९

                      विवेकानंद अमृत २३९


     मूर्तीपूजेचा ज्याने निषेध केला त्याने  स्वतः च्या दैवताखेरीज अन्य सर्वांच्या दैवतांना निषिद्ध मानले . परमेश्वर एखाद्या प्रतीकाच्या रुपात, सुंदर रुपात प्रकट झाला तर ती भयंकर गोष्ट आहे, असे ज्या ज्यू पुरुषाने म्हटले. त्याची पूजा करणे पाप आहे असेही त्याने घोषित केले . पण देवदूत एक पेटी घेऊन चालले आहेत, त्यांच्यावर एक ढग तरंगत आहे असे जर परमेश्वराचे रूप असले तर मात्र ते पवित्र-पवित्रतम आहे ! कबुतराच्या रूपातला परमेश्वर पवित्र आणि गायीच्या रूपातला अत्यंत अपवित्र - त्याचा त्याग करा ! धिक्कार करा ! हा कोणता न्याय ?    

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३८

                       विवेकानंद अमृत २३८

     जगातील श्रेष्ठ प्रेषित नेहमी असे म्हणत आले आहेत की, मी जगाच्या विनाशासाठी आलेलो नाही तर ते अधिक परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे . हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे . पुष्कळदा ही गोष्ट लक्षात न आल्याने त्यांची क्षमाशीलता ही तत्कालीन लोकप्रिय मतांशी केलेली अयोग्य तडजोड आहे अशी समजूत होऊ शकते . आजही आपण ऐकतो की, प्रेषित हे भित्रे होते आणि त्यांना जे म्हणायचे होते ते ते स्पष्टपणे म्हणू शकले नाहीत . पण हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे . 

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३७

                        विवेकानंद अमृत २३७

     आपल्या मुलांकडे वात्सल्याने पाहावे अशा रीतीने हे महान दृष्टे जगाकडे पाहात . त्यांची ही अथांग प्रेमशक्ती धर्मांधांच्या ध्यानी आली नाही . त्यांचे हृदय अथांग करुणेने आणि तितिक्षेने भरलेले असल्याने, प्रेमळ पिता मुलांचे अपराध जसे सोसतो तसे त्यांनी जगाचे अपराध सोसले . मानवी समाजाची प्रगती कशी व्हायला हवी याचे स्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे होते . शांतपणे, धीराने त्यांची उपाययोजना चाललेली होती . कुणाला शिव्याशाप न देता, कुणाला भय न दाखवता, ऋजुतेने, प्रेमाने त्यांनी आपल्याला एकेक पाऊल पुढे नेले . 


बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३६

                         विवेकानंद अमृत २३६

     उपनिषदांच्या कर्त्यांना परमेश्वराविषयींच्या जुन्या प्रचलित कल्पना या तत्कालीन विकसित नितीनियमांशी जुळणाऱ्या नव्हत्या हे त्यांना कळत होते . नास्तिक जे प्रतिपादन करत होते त्यात सत्याचा पुष्कळच अंश होता हेही ते जाणून होते . पण त्यांना हेही ठाऊक होते की, नव्याला जुन्याशी बांधणारा परंपरेचा धागा तोडून टाकला तर नवसमाजरचनेची सारी स्वप्ने फोल होतील . त्या धाग्यावाचून सारे मोती विखरून जातील . 

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३५

                   विवेकानंद अमृत २३५

     पूर्वजांनी मांडलेल्या ईश्वरविषयक कल्पना निरर्थक म्हणून टाकून देण्याऐवजी त्यांतील सत्याचा शोध आपल्या ऋषींनी सुरु केला . परिणाम असा झाला की वेदांत-तत्वज्ञानाला जुनी दैवते, एकेश्वर, विश्वाचा स्वामी यांचा शोध करता करता श्रेष्ठ-श्रेष्ठतर तत्वे गवसत गेली . अद्वैत-सिद्धांताचा शोध लागला. चराचरात त्यांना एकल्या एक परब्रह्माचा साक्षात्कार झाला . 

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३४

                       विवेकानंद अमृत २३४

     एक भव्य सुंदर वास्तू  , गतकालीन वैभवाचा अवशेष आजही आपल्याकडे टिकून आहे . ही वास्तू दुर्लक्ष केल्याने, वावर नसल्याने पडीक होऊन राहिली आहे . भग्न झाली आहे . तिथे धूळ-कचऱ्याची पुटे जमली आहेत . काही पडझड झाली आहे . या वास्तूचे तुम्ही काय कराल ? आवश्यक ती स्वच्छता कराल,डागडुजी कराल आणि ती पूर्ववत उभी कराल की, जी आहे तीही मातीला मिळवून तिच्या जागी जिच्या पक्केपणाची काही शाश्वती देत येत नाही अशी नवी वास्तू बांधाल ? आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे . पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे .  

रविवार, २२ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३३

                       विवेकानंद अमृत २३३

     आपण सर्वस्वी नवे असे काहीच निर्माण करत नसतो . काही इकडचे तिकडे करतो इतकेच . आपल्याजवळ देण्यासारखे अगदी नवे असे काही नसते . आपण काही रचना, आकृतिबंध बदलत असतो . बीजातून वृक्ष निर्माण होतो तो सावकाश, धीमेपणाने, शांतपणाने . आपणही आपल्या शक्ती ' सत्य ' उमलविण्याच्या दिशेने लावाव्यात . सत्याचे संपूर्ण प्रकटीकरण व्हावे यासाठी लावाव्यात . नवी सत्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये .  

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३२

                      विवेकानंद अमृत २३२

     जे सुधारक मूर्तीपूजेवर टीकेची झोड उठवितात त्यांना मी विचारतो, " बंधूंनो, कोणत्याही बाह्य गोष्टीची मदत न घेता निर्गुणाची उपासना करणे शक्य असेल तर खुशाल करा . पण ज्यांना ती तशी करता येत नाही त्यांची निंदा का म्हणून करता ? " 

विवेकानंद अमृत २३१

                        विवेकानंद अमृत २३१

     सुधारणावादी पंथ हा केवळ सुधारणा करण्यातच गुंतला तर त्याचे अस्तित्वच कालांतराने पुसले जाईल . प्रत्यक्ष प्राणचैतन्याची ओळख त्या पंथाला झाली असेल तरच तो जगेल . एकदा आवश्यक सुधारणा झाली की, त्या समाजातील विधायक शक्तीला, बलस्थानांना आवाहन केले पाहिजे . 


शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३०

                        विवेकानंद अमृत २३०

     हे अमृताच्या पुत्रांनो ! माझ्या देशबांधवांनो ! आपल्या राष्ट्राची ही नौका शतकानुशतके प्रवास करीत आहे . आपल्या अमोल संस्कृतीचे देणे देऊन जगाला समृद्ध करीत आहे . जीवनसागरातून या राष्ट्रीय नौकेने आजवर अनेक शतके वाटचाल केली आहे आणि लक्षावधी जीवांना सर्व दुःखे ओलांडून पैलपार पोचविले आहे .  

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२९

                     विवेकानंद अमृत २२९

     आपले तत्वज्ञान सांगते की, वाईट आणि चांगले हे सदैव परस्परांशी निगडीत असते . एक असले की दुसरे आहेच . त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . समुद्रात एका ठिकाणी लाट निर्माण होते तेव्हा दुसरीकडे पाणी खोल जाते . नव्हे, सारे जीवनच तसे दुरिताने भरलेले आहे . कित्येक जीवजंतूंना मारल्याशिवाय साधा श्वास सुद्धा घेणे शक्य नाही . कोणाकडून तरी हिरावून घेतल्याशिवाय अन्नाचा एक घास खाणे शक्य नाही . जीवनाचा हाच नियम आहे . हेच तत्वज्ञान आहे .  

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२८

                      विवेकानंद अमृत २२८

     अनिष्टाविरुद्धची लढाई ही फार सापेक्ष आहे . वस्तुनिष्ठ नाही . आपण कितीही बढाया मारल्या तरी अनिष्टाविरुद्धची लढाई ही आपल्या शिक्षणासाठी आहे . या विचाराने आपल्या मनाला स्वस्थता यायला पाहिजे . 

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२७

                      विवेकानंद अमृत २२७

     जगाच्या  इतिहासाकडे पाहिले तर ध्यानात येते की, आततायी सुधारणावाद्यांना नेहमीच पराभव पत्करावा लागला आहे . अमेरिकेत गुलामगिरी विरुद्ध जे युद्ध झाले ते स्वातंत्र्य आणि न्याय यांसाठी झालेले सर्वांत मोठे युद्ध म्हणावे लागेल. त्याचा परिणाम काय झाला ? वर्णयुद्धाच्या पूर्वी गुलामांची जी स्थिती होती त्यापेक्षा आता वाईट स्थिती आहे .  

विवेकानंद अमृत २२६

                        विवेकानंद अमृत २२६

     हिंदुस्थानातील मूर्तिपूजा ही, सगुण परमेश्वराचे अस्तित्व बुद्धाने सतत आग्रहाने नाकारले त्याची प्रतिक्रिया आहे . वेदांमध्ये मूर्तिपूजा नाही . परंतु जनक आणि मित्र अशा स्वरुपात असलेला सगुण ईश्वर हिरावून घेतला गेला त्याची प्रतिक्रिया म्हणून महापुरुषाची पूजा होऊ लागली . इतकेच काय, स्वतः बुद्धाची मूर्ती घडली आणि लाखो लोक बुद्धमूर्तीची पूजा करू लागले .  

रविवार, १५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२५

                         विवेकानंद अमृत २२५

     हिंदुस्थानातल्या सामान्य जनतेपर्यंत ज्ञान आणि प्रकाश यांचा वारसा पोचलेलाच नाही . युरोप गेल्या काही शतकात परिपूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास करीत आहे . हिंदुस्थानात मात्र ' राजा कालस्य कारणम ' अशीच स्थिती राहिलेली आहे . कुल-गोत्र-वर्ण यांपासून ते काय खावे, काय खाऊ नये येथपर्यंत सर्व काही सत्ताधारीच ठरवितो . उलट पाश्चात्य देशात लोकसत्तेने सर्व व्यवहार निश्चित होतात . 

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२४

                         विवेकानंद अमृत २२४

     आळशी, निष्क्रिय, भोगाची लालसा धरणारे लोक जगात टिकतील तरी किती दिवस ? प्रथम पाश्चात्य जगाचा प्रवास करा . पहा आणि मग माझ्या विधानाला विरोध करा . पाश्चात्य माणसे किती उद्यमशील, कार्यनिष्ठ आहेत पहा ! जणू चैतन्याची, रजोगुणाची मूर्तरुपेच ! 


शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२३

                       विवेकानंद अमृत २२३

     हिंदुस्थानात रजोगुण जणू अस्तित्वातच नाही . तीच गोष्ट पाश्चात्य देशात सत्वगुणाबाबत आहे . त्यामुळे पाश्चात्य देशांत हिंदुस्थानाकडून सत्वाचे अध्यात्मिकतेचे प्रवाह पोहोचायला हवेत हे निःसंशय खरे आहे . आणि दुसरीकडे हेही खरे आहे की, जोवर आम्ही रजोगुणांच्या सहाय्याने आमच्या तमोगुणावर मात करत नाही, तोवर आमचे आदिभौतिक कल्याण होण्याची सुतराम शक्यता नाही . 




गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२२

                     विवेकानंद अमृत २२२

     त्यागाशिवाय शांती कोणाला प्राप्त झाली आहे ? पारलौकिक हितापुढे ऐहिक हित हे नगण्य आहे हे खरेच . त्याविषयी शंका नाही . सत्वगुणाइतकेच, संपूर्ण चित्तशुद्धीइतके सामर्थ्यशाली दुसरे काय आहे ? आत्मज्ञानापुढे अन्य सर्व प्रकारचे ज्ञान हे तुच्छ आहे . 

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२१

                        विवेकानंद अमृत २२१

     लहान मुलाला काही आपण संन्यासधर्म शिकवू शकत नाही . त्यागाचा उपदेश करू शकत नाही . लहान मूल हे मुळातच आशावादी असते . त्याची इंद्रिये त्याचे लळे हेच त्याचे जीवन . सर्व समाजांमध्ये अशी बालवत असलेली माणसे असतात . काही सुख-आनंदाचा अनुभव त्यांना आवश्यकच असतो . 

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२०

                       विवेकानंद अमृत २२०

     तुम्हाला दिसत नाही का की, सत्वगुणाच्या बुरख्याखाली हा देश तमोगुणाच्या गहन अज्ञानाच्या समुद्रात बुडत आहे ? जे मंदबुद्धी आहेत ते उच्चतम ज्ञानाच्या इच्छेचा खोटा आभास निर्माण करून आपले उणे झाकताहेत . ते उच्चतम ज्ञान सर्व कायिक, मानसिक कर्मांच्या पलीकडे आहे .  

विवेकानंद अमृत २१९

                          विवेकानंद अमृत २१९

     येथे कुणालाच स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही; पण दुसऱ्याच्या डोळ्यातल्या कुसळावर मात्र सारे उत्साहाने तुटून पडताहेत . परक्यांच्या विचारांचा चोथा चघळणे हे इथे ज्ञान मानले जाते आणि पूर्वजांची कीर्ती गाण्यात कृतार्थता मानली जाते .  


शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१८

                        विवेकानंद अमृत २१८

     आपल्यापैकी ज्यांना परमहंसपदी पोहोचावेसे वाटते, पण त्यासाठी अद्याप सिद्धता झाली नाही अशांनी प्रथम रजोगुणाची - संतत कर्माची साधना केली पाहिजे . तेच त्यांना लाभदायक आहे . रजोगुणातून पार झाल्याशिवाय पूर्ण सत्वगुणाची प्राप्ती होणे कसे शक्य आहे ? 

विवेकानंद अमृत २१७

                       विवेकानंद अमृत २१७

     योग म्हणजे ईश्वराशी मिळून जाणे . भोगवासना जर अतृप्त राहिल्या तर ईश्वराशी मीलन शक्य तरी आहे काय ? सर्व सुखे, सर्व वासना, तुच्छ वाटू लागल्याशिवाय वैराग्य किंवा वासनारहित अवस्था येणार कशी ? आणि वैराग्य नसेल तर संन्यासाची तरी अपेक्षा धरावी कशी ? 


गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१६

                        विवेकानंद अमृत २१६

     प्रत्येक प्रश्नाच्या थेट मुळाशी जायला हवे . त्याला मी खरी सुधारणा म्हणेन . तेथे भिडा, तेथे वणवा धगधगू द्या, त्या ज्वाळा वर जाऊ देत . मग पहा सारे हिंदुराष्ट्र कसे पेटून उठते ते ! 


विवेकानंद अमृत २१५

                      विवेकानंद अमृत २१५

     आपल्या धर्माला दोषी ठरवू नका . दोन-चार मूर्तींची पूजा केली वा न केली यामुळे काही फरक पडत नाही . मुळातला दोष आहे तो असा की, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये खरा देश आहे; तो आपला पुरुषार्थ, आपली अस्मिता विसरला आहे . चैतन्याला फुंकर घातली पाहिजे - जागविले पाहिजे ! 

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१४

                      विवेकानंद अमृत २१४

     त्यांच्या मनात नवनव्या प्रेरणा फुलविल्या पाहिजेत . जगात काय चालले आहे ते लख्ख नजरेने पाहायला त्यांना शिकविले पाहिजे . मग त्यांच्या मुक्तीचा मार्ग तेच शोधून काढतील . प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मुक्तीचा मार्ग स्वतःच शोधला पाहिजे .  


विवेकानंद अमृत २१३

                       विवेकानंद अमृत २१३

     आपल्या उपेक्षित बांधवांना आज हवी आहे ती केवळ प्रेरणा ! मग बाकीचे सारे आपोआप घडून येईल . आपण केवळ रसायने एकत्र करूया . त्यातून स्फटिक रचनांची किमया आपोआप घडून येईल . आज जर या देशात खरेच काही करायला हवे असेल तर ते श्रेष्ठ प्रेरणांचे संचरण ! 

सोमवार, २ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१२

                      विवेकानंद अमृत २१२

     जेव्हा पाश्चात्य देशात शिक्षण आणि संस्कृती ही पांढरपेशा उच्चभ्रुपुरती मर्यादित न राहता समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचे खरे आधुनिकीकरण झाले . आणि तिथपासूनच त्यांच्यात आणि हिंदुस्थान, इजिप्त, रोम यांच्या प्राचीन संस्कृतीत झपाट्याने अंतर पडत गेले . मी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, शिक्षण आणि विचार यांचे अभिसरण एखाद्या देशातल्या बहुजन समाजात जसजसे होत जाईल तसतसे त्या देशाचे रूप पालटू लागते . 

विवेकानंद अमृत २११

                         विवेकानंद अमृत २११

     हिंदुस्थानात शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली . अहंमन्य वृत्तीने आणि राजसत्तेच्या बळावर काही मूठभर माणसांनी येथील सर्वसामान्य माणसांना अमोल विचारधनापासून वंचित ठेवले . हिंदुस्थानचे उत्थान पुनश्च एकवार घडवायचे असेल तर बहुजनसमाजात फार मोठा शिक्षणाचा प्रसार करायला हवा .