मंगळवार, ३० जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७९

                         विवेकानंद अमृत १७९ 

     आता अन्य देवदेवतांना मनात स्थानच नको . आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र . त्याचीच आराधना करा . ते जागृत आहे . सर्वत्र त्याचेच चरण, त्याचेच हात, त्याचेच श्रवण . तो सर्वव्यापी आहे . बाकी सर्व दैवते झोपली आहेत . त्या विराटाचे दर्शन सर्वत्र होत असताना अन्य देवतांची ही व्यर्थ आराधना कशाला ? या एकमेव उपास्य दैवताची उपासना आपल्या हातून घडू दे . त्यातच इतर दैवतांची उपासना आपोआप घडेल . 


विवेकानंद अमृत १७८

                      विवेकानंद अमृत १७८ 

     जो इतरांसाठी सर्वस्व अर्पण करतो, तोच मुक्तीचा अधिकारी आहे . ' मला मुक्ती हवी, मला मुक्ती हवी ' असे जे रात्रंदिवस घोकत असतात आणि आपला मेंदू शिणवत असतात, त्यांनी इहलोकी आणि परलोकी कुठेच आपले कल्याण साधलेले नसते.  

सोमवार, २९ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७७

                      विवेकानंद अमृत १७७ 

     आपल्याला जर खरे काही हवे असेल, तर ती चित्तशुद्धी . ती कशी मिळेल ? प्रथम विराटाची पूजा करा . आपल्या भोवतालच्या सर्वात त्या विराटला पहा . मनुष्यमात्र आणि प्राणिमात्र, आपले सर्व देशबांधव ही आपली दैवते आहेत . सर्वप्रथम त्याची पूजा करा .  

विवेकानंद अमृत १७५

                      विवेकानंद अमृत १७५ 

     लोखंडाचे बाहू , पोलादाच्या नसा आणि आत बसणारे वज्राचे मन मला हवे आहे . ' मन वज्र हवे, अन मनगट ते पोलाद ! ' सामर्थ्य, पुरुषार्थ, क्षात्र-वीर्य आणि ब्राह्मतेज ही आहेत आमची इप्सिते ! ही आमची मुले कशी तरुण आणि उमदी आहेत ; त्यांना समाजाने विवाह नावाच्या बलीवेदी-वर बळी दिले नाही तर ती केवढे बरे कार्य करतील .  

शुक्रवार, २६ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७४

                    विवेकानंद अमृत १७४ 

     काही थोडे तरी लोक उभे राहू देत . त्यांचे जीवन ईश्वरार्पित असू दे . त्यांच्या हातून धर्मरक्षण होऊ दे . प्रत्यक्षात केवळ भ्रमाचेच  ' जनक ' असताना आपण जनक राजासारखे संसारात असूनही विरागी असल्याचा आव आणू  नका . प्रामाणिकपणे म्हणा, ' मला हा आदर्श कळला आहे, पण मी अद्याप त्यापर्यंत पोहोचू शकत नाही . '

बुधवार, २४ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७३

                    विवेकानंद अमृत १७३ 

     जर तुम्ही खरोखरच त्याग केला असेल तर उत्तम आहे . अगदी दृढपणे उभे रहा . या धर्मयुद्धात जरी शेकडो धारातीर्थी पडले तरी त्यांच्या हातातील ध्वज तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि धीराने पुढे चाला . यशापयशाचा विचार करू नका . ईश्वरी सत्ता सत्य आहे, समर्थ आहे . तिची यशोध्वजा एकाच्या हातून दुसऱ्याच्या हाती जाईल, पण खाली कधीच येणार नाही . 

सोमवार, २२ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७१

                    विवेकानंद अमृत १७१

     पुन्हा पुन्हा या देशाला ग्लानी आलेली आहे . आणि पुन्हा पुन्हा भगवंताने या भूमीला संजीवनी देण्यासाठी जन्म घेतला आहे .  
     मृत व्यक्ती कधीही परत येत नाहीत . गेलेला दिवस कधीही परत येत नाही . भरतीची एकदा येउन गेलेली लाट पुन्हा येत नाही . एकदा त्याग केलेल्या शरीरात तोच जीव पुन्हा येत नाही . तेव्हा मृत भूतकाळाचे पूजन करण्यापेक्षा हे बंधो ! या चैतन्यमय वर्तमानाचे पूजन करण्यासाठी तुला साद घालीत आहोत . जे घडून गेले त्याच्याविषयी शोक करणे आता पुरे . आता नव्या उभारीने कामाला लागू या . हरवलेले, उध्वस्त झालेले रस्ते शोधून काय उपयोग ? आता नवे प्रशस्त राजमार्ग खुले झाले आहेत . 

रविवार, २१ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७०

                     विवेकानंद अमृत १७० 

     ज्या शक्तीच्या पहिल्या हुंकाराचे पडसाद चारी खंडात घुमले, तिच्या परमसामर्थ्याची कल्पना तर करून पहा . मिथ्या कल्पना, मानसिक दौर्बल्य आणि मत्सरी वृत्ती हे गुलामांचे गुणधर्म आहेत . फेकून दे ते, आणि नव्या उभारणीच्या या विराट चक्राला तुझ्या हाताने गती मिळू दे .  

विवेकानंद अमृत १७६

                      विवेकानंद अमृत १७६

     त्याग आणि सेवा हे हिंदुस्थानचे राष्ट्रीय आदर्श आहेत . ते दृढतम करा . मग बाकीचे आपोआप  घडून येइल. अध्यात्माची ध्वजा या देशात सततच उंच फडकत आहे . त्यागी आणि सेवावृत्ती होण्यातच मुक्ती आहे.    

विवेकानंद अमृत १६९

                         विवेकानंद अमृत १६९

     आपण परमेश्वराचे सेवक आहोत, सुपुत्र आहोत . त्याची इच्छा पूर्ण करणे हे आपले काम आहे . अशा विनीत भावनेने आणि प्रखर निर्धाराने कार्याच्या या प्रांगणात पाऊल ठेवा . 

शुक्रवार, १९ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६८

                  विवेकानंद अमृत १६८ 

     या हिंदू जातीचा जो निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि रक्षणकर्ता आहे; विष्णू , शिव, शक्ती किंवा गणपती अशा विविध रुपात आमच्या पूर्वजांनी ज्याची अर्चना केली; ज्याची मूर्त किंवा अमूर्त, सगुण किंवा निर्गुण रूपात पूजा केली; ' एक सत् विप्राः बहुधा वदन्ति ' या शब्दात ज्याचे वर्णन केले तो परमेश्वर, ज्याच्या विराट प्रेमशक्तीसह आमच्या हृदयात अवतरीत होवो . त्याचे शुभाशीर्वाद आम्हास लाभोत . त्यामुळे आमच्यांत परस्परांना समजून घेण्याची शक्ती, परस्परांविषयींच्या खऱ्या जिव्हाळ्याने काम करण्याची शक्ती येवो . व्यक्तिगत कीर्ती, प्रतिष्ठा, स्वार्थ यांच्या लवलेशाचाही आमच्या मनांना स्पर्श न होवो . अशा विशुद्ध भावाने हिंदुराष्ट्राच्या पुनर्निर्माणाच्या कार्यात आमचा प्रवेश होवो .  

गुरुवार, १८ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १७२

                     विवेकानंद अमृत १७२

     मृगेन्द्राचे धैर्य, ईश्वरावरील श्रद्धेतून लाभलेले सामर्थ्य यांनी संपन्न असे लक्षावधी स्त्री-पुरुष येथील पददलितांविषयीच्या अपार करुणेने प्रेरित होऊन जेव्हा देशाचा या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार करतील आणि मुक्तीचा, सेवेचा, सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा संदेश सर्वत्र पोहोचवतील, तेव्हा हिंदुस्थानच्या पुनरुत्थानाची पहाट उजाडेल.  

विवेकानंद अमृत १६७

                   विवेकानंद अमृत १६७

     प्राचीन भूतकाळात आपल्या देशाने आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठी झेप घेतली होती . आज आपल्या मनःचक्षुंपुढे तो प्राचीन इतिहास अवश्य आणूया . पण एक धोका मात्र ध्यानी घेतला पाहिजे . गतवैभवाच्या स्मरणातच जर आम्ही संतुष्ट होऊन राहिलो, पूर्वजांच्या पराक्रमाची पोकळ बढाई मारत राहिलो तर पुरुषार्थ आणि प्रेरणेची भावनाच आपल्या मनातून नाहीशी होईल . ते कटाक्षाने टाळले पाहिजे .  

बुधवार, १७ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६६

                   विवेकानंद अमृत १६६ 

     भरतभूमीविषयी अपरंपार भक्ती मनात असूनही, पूर्वजांच्या विषयी अतीव आदर मनात असूनही मला असे म्हणायचे आहे की, कोणाच्याही पायापाशी बसून शिकण्याची आपली तयारी असली पाहिजे . प्रत्येकाकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे . त्याचबरोबर जगाला देण्यासारखेही आपल्याकडे पुष्कळच आहे .   

मंगळवार, १६ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६५

                           विवेकानंद अमृत १६५ 

     एक हजार वर्षांची गुलामगिरी आपल्या वाट्याला आली . आपण इतर देशांमध्ये काय चालले आहे ते पाहिले नाही, भोवतालच्या घडामोडींची दखल घेतली नाही हे हिंदूंच्या अवनतीचे कारण आहे . त्याची पुरेशी शिक्षा आपण भोगली आहे . आता त्याच चुका पुन्हा करायला नकोत . 




सोमवार, १५ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६४

                   विवेकानंद अमृत १६४ 

     हिंदूंनी हिंदुस्थानाबाहेर जायचे नाही असल्या वेडपट कल्पनांना डोक्यात थारा देऊन उपयोग नाही . आपण जेवढे बाहेर जाऊ, जगातले जेवढे देश पाहू , तेवढे आपले कल्याण होईल . हे जर शतकांपूर्वीच आपण केले असते तर हिंदुस्थानावर स्वामित्व गाजविण्याची ईर्ष्या धरणाऱ्या प्रत्येक सत्तेच्या पायाशी दीनवाणेपणे बसणे आपणास प्राप्त झाले नसते . 

रविवार, १४ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६३

                        विवेकानंद अमृत १६३

     व्यापक होणे - विस्तारणे ही चैतन्याची खूण आहे . आपल्याला चैतन्यपूर्ण रहायचे असेल तर जगात सर्वत्र गेले पाहिजे . ज्या क्षणी ही विस्ताराची उर्मी थिजेल त्या क्षणी मृत्यू ठरलेलाच आहे . मी युरोप - अमेरिकेस प्रयाण केले कारण ती काळाची गरज होती . आपले राष्ट्रीय चैतन्य व्यापक होत आहे याचे ते पहिले शुभचिन्ह होते . त्या स्फुरणाऱ्या राष्ट्रीय चैतन्याने जणू मला बाहेर फेकले, आणि सहस्रांना ते बाहेर फेकील . माझे हे शब्द स्मरणात ठेवा . जोवर हे राष्ट्र जिवंत आहे तोवर हे घडणारच . आपण असे बाहेर जाऊ तरच जगाच्या ज्ञानसंचायात आपण काही मोलाची भर घालू शकू . 

विवेकानंद अमृत १६२

                      विवेकानंद अमृत १६२ 

     प्रत्येक राष्ट्राला जिवंत राहण्यासाठी काही द्यावे लागते .काही घ्यावे लागते . चैतन्य दिल्याने मिळते . आपण इतरांकडून जेव्हा काही घेतो तेव्हा त्यांना काही देणे हे आपले कर्तव्यच असते . ज्या अर्थी आपण सहस्रो वर्षे जिवंत आहोत त्या अर्थी सहस्रो वर्षे आपण सतत देत आलो आहोत हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे . अज्ञानी लोक काही का समजेनात ! धर्म आणि तत्वज्ञान, ज्ञान आणि अध्यात्म यांचे अमोल देणे हिंदुस्थान जगाला देत आला आहे .  

शनिवार, १३ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६१

                     विवेकानंद अमृत १६१ 

     आपण बाहेर गेले पाहिजे . अध्यात्मज्ञानातील रहस्ये सांगून भौतिकज्ञानाची रहस्ये जाणून घेतली पाहिजेत . आपण सदैव विद्यार्थीभावाने जाणार नाही, शिक्षकाच्या भूमिकेतूनही आपल्याला जावे लागेल . समानतेशिवाय मित्रत्व शक्य नाही . आणि जेव्हा एक बाजू सदैव दात्याच्या भूमिकेत असते . तिथे समानता-मित्रत्व शक्य नाही कारण दुसऱ्या पक्षाला नेहमी पहिल्याच्या पायाशीच बसावे लागते ! शिकता शिकता शिकवूनच आपल्याला पाश्चात्यांची बरोबरी करता येईल . अजून शेकडो वर्षे जगाला देता येईल एवढा ज्ञानसंचय हिंदुस्थानाकडे आहे . 

शुक्रवार, १२ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १६०

                     विवेकानंद अमृत १६० 

     जेव्हा माणसांना आपल्या पूर्वजांची लाज वाटू लागेल तेव्हा त्यांच्या वंशाचा शेवट जवळ आला आहे असे खुशाल समजावे . हिंदुसमाजाचा मी अतिसामान्य घटक आहे . पण मला हिंदू म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो . सर्वांचा मी एक अतिसामान्य सेवक आहे . याचाच मला अभिमान वाटतो . ज्यांच्या दैदिप्यमान ज्ञानाने जगाला उजळले अशा ऋषीमुनींचे; धर्मात्म्यांचे तुम्ही वंशज आहात आणि मी तुमचा देशबांधव आहे याचा मला फार अभिमान वाटतो . 

गुरुवार, ११ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५९

                     विवेकानंद अमृत १५९ 

     तुम्ही भूमीत एखादे बीज रोवले; त्याला पुरेशी माती, हवा, पाणी दिलेत की त्याचा महाकाय वृक्ष बनतो . त्याची माती बनते का ? पाणी बनते का ? पंचमहाभूताकडून हवे ते घेत त्या बीजाचे रोप होते . त्या रोपाचा त्याच्या बीजस्वभावानुसार वृक्ष होतो . आपण त्या वृक्षासारखे असले पाहिजे .  

बुधवार, १० जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५८

                       विवेकानंद अमृत १५८ 

     इतरांकडे जे जे चांगले असेल ते ते शिका . पण ते योग्य प्रकारे आत्मसात करा . इतरांची नक्कल होऊ नका . हिंदू जीवनाच्या महाप्रवाहापासून दूर जाऊ नका . सर्व भारतीयांनी दुसऱ्या एखाद्या समाजाप्रमाणे पोशाख वा जेवणाखाणाच्या पद्धती स्वीकारल्यामुळे भारताचे भले होणार आहे, अशा खुळ्या विचाराला क्षणभरही मनात थारा देऊ नका . 


मंगळवार, ९ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५७

                    विवेकानंद अमृत १५७ 

     राष्ट्रचैतन्याचा हा प्रवाह अक्षुण्ण वाहात राहावा म्हणून त्याच्या मार्गातले अडथळे दूर करा, त्याचा मार्ग प्रशस्त करा . मग आपल्या स्वाभाविक स्फुर्तीसह तो जोमाने पुढे जाईल . आणि राष्ट्र झपाट्याने यशामागून यश संपादन करीत प्रगती करील . 

विवेकानंद अमृत १५६

                       विवेकानंद अमृत १५६ 

     काही थोड्या वर्षांची सवय मोडणे सुद्धा कठीण असते . मग हे वैशिष्ट्यपूर्ण हिंदू जीवनचैतन्य तुमच्या रक्तातून किती सहस्त्र वर्षे वाहत आहे ते एक परमेश्वर जाणे ! हा प्रचंड ओघ आता सागराला अगदी येउन भिडला आहे . त्याला पुन्हा हिमालयाकडे उलटे फिरवायचे ? सर्वस्वी अशक्य आहे ते . तसे करू जाल तर हा ओघच नष्ट होईल . 

शनिवार, ६ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५५

                    विवेकानंद अमृत १५५ 

     आज आपण अनेक परकीय कल्पनांच्या आहारी गेलो आहोत . या कल्पना आपल्या राष्ट्रधर्माचा प्राणच शोषून घेत आहेत . आपण असे मागासलेले का ? आपल्यातील नव्याण्णव टक्के लोक पाश्चात्य तत्वे आणि जीवनपद्धती यांच्या मुशीतून काढल्यासारखे का दिसतात . आपल्याला राष्ट्र्मालिकेत श्रेष्ठ पद हवे असेल तर ही सर्व गुलामी झुगारून दिली पाहिजे . 

विवेकानंद अमृत १५४

                      विवेकानंद अमृत १५४ 

     आपल्या धर्मातून दूर गेलेल्या या लोकांसाठी  आम्ही आसवे ढाळीत आहोत . पण आधी आम्ही त्यांच्यासाठी काय केले ? आम्ही ह्यापासून काही बोध घेतला आहे का ? सत्याची धर्मदिवी आम्ही खरोखर हाती घेतली होती काय ? किती काळपर्यंत आम्ही तिच्या प्रकाशात प्रवास केला ? 
     आपण आपल्या धर्मांतरित बांधवांना  जेव्हा मदत करायला हवी होती तेव्हा केली नाही . हेच आमचे महापाप आहे . म्हणून दोष द्यायचा तर तो इतर कोणाला नव्हे - आपल्या कर्माला दिला पाहिजे .   

गुरुवार, ४ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५३

                      विवेकानंद अमृत १५३ 

     खरे तर प्रत्येकाच्या शरीरातून असंख्य रोगजंतू सारखे संचार करीत असतात . पण शरीर बलवान असते तोवर ते त्यांना दाद देत नाही . शरीर दुर्बल होते तेव्हाच जंतू त्याचा ताबा घेतात आणि रोग उत्पन्न करतात . राष्ट्राचेही तसेच आहे . 

बुधवार, ३ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५२

                  विवेकानंद अमृत १५२ 

     राष्ट्राचे शरीर दुर्बल झाले की, त्याच्या राजकीय जीवनात, सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्थांमध्ये सर्व प्रकारचे जंतू घुसतात आणि त्या यंत्रणा दुर्बल करून टाकतात . यावर उपाय एवढाच की, रोगाच्या मुळाशी गेले पाहिजे. रक्तातूनच सर्व अशुद्धता काढून टाकली पाहिजे . अशा प्रकारे रक्त शुद्ध झाले, शरीर मजबूत झाले की, ते बाहेरून आलेली सगळी विषे बाहेर फेकून देईल, सामर्थ्यसंपन्न होईल !   

विवेकानंद अमृत १५१

                       विवेकानंद अमृत १५१ 

     आमचा धर्म स्वयंपाकघरातल्या सोवळ्या भांड्यांमध्ये गुदमरून जात आहे . आम्ही वेदांती कसले, पौराणिक कसले नि तांत्रिक कसले ! आम्ही आहोत ' शिवू नको ' वादी ! आमचा धर्म आहे स्वयंपाकघरात . देव आहे चुलीवरच्या भांड्यात . सारे धर्मसार आहे : ' मी पवित्र आहे - मला शिवू नका ' ह्या वेड्या आग्रहात . ते असेच आणखी शंभर वर्षे चालू राहिले तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांचे इस्पितळ  गाठावे लागेल . 


सोमवार, १ जुलै, २०१३

विवेकानंद अमृत १५०

                          विवेकानंद अमृत १५०

     थोडे पाश्चिमात्य जगातले ज्ञान मिळाले की, ' पी हळद आणि हो गोरी ' या न्यायाने आपल्याकडचा माणूस स्वतःला सर्वज्ञ समजू लागतो . तो आपल्या प्राचीन ऋषीमुनींची टिंगल करतो . सर्व हिंदू विचार म्हणजे एक थोतांड आहे, बालिश बडबड आहे असे त्याला वाटू लागते . आणि धर्म म्हणजे चार खुळ्या लोकांच्या अंधश्रद्धांचे गाठोडे आहे असे तो बरळत सुटतो .