रविवार, ३० जून, २०१३

विवेकानंद अमृत १४९

                     विवेकानंद अमृत १४९ 

     माझ्या तरुण मित्रांनो ! आपण प्रथम सुदृढ झाले पाहिजे, धर्माचरण नंतर करता येईल. माझे तुम्हाला एवढेच आग्रहाचे सांगणे आहे की, सामर्थ्याची उपासना करा . गीतेचा अभ्यास करून तुम्ही परमेश्वराच्या जेवढे जवळ जाल, त्यापेक्षा फुटबॉलच्या मैदानावर शरीरसंपदा कमावून जास्त जवळ जाल .  

शनिवार, २९ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४८

                       विवेकानंद अमृत १४८ 

     तुमचे बाहू बलदंड झाल्याने तुम्हाला गीता अधिक चांगली समजेल . तुमच्या धमन्यामधले रक्त तेजीने उसळू लागले की, मग भगवान श्रीकृष्णासारख्या महापुरुषाची विराट प्रज्ञा आणि अपूर्व सामर्थ्य यांचे तुम्हाला काही आकलन होईल . तुमची शरीरे सतेज झाली, तुम्ही पराक्रमी, पुरुषार्थी झालात की, मग उपनिषदांमध्ये वर्णन केलेला तो परम तेजस्वी आत्मा तुमच्या बुद्धीला कळू शकेल . 

विवेकानंद अमृत १४७

                         विवेकानंद अमृत १४७ 

     आम्ही पोपटपंची तर खूपच करतो, पण काम काहीच करत नाही ! बोल बोल बोलायचे आणि कृतीशून्य असायचे, हे जणू आमच्या अंगवळणीवच पडून गेले आहे . याचे कारण काय ? शारीरिक दौर्बल्य हेच याचे कारण. क्षीण मेंदूला भव्य कल्पना सुचणे कसे शक्य आहे ? तो सामर्थ्यवान झालाच पाहिजे !
     आज जर खरे काही हवे असेल तर ते रक्तातील उसळते चैतन्य, लोखंडाचे बाहू आणि पोलादाच्या नसा ! मन मिळमिळीत करणाऱ्या स्वप्नाळू कल्पनांचा पहिल्यादा त्याग करा . 

शुक्रवार, २८ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४६

                   विवेकानंद अमृत १४६ 

     आपण एकत्र येऊ शकत नाही . परस्परांवर प्रेम करू शकत नाही . पराकाष्ठेचे स्वार्थी झालो आहोत आपण ! चार माणसे एकत्र जमलो तर लगेच आपण परस्परांचा द्वेष करू लागतो, तिरस्कार करू लागतो . 
     त्या निंद्य मत्सरबुद्धीचा त्याग करा . ते कुत्र्यामांजरासारखे परस्परांवर गुरगुरणे, भुंकणे सोडून द्या . शुद्ध हेतूसाठी, शुद्ध साधनांसह अचल धैर्याने कार्य करण्यास सिद्ध व्हा .   


बुधवार, २६ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४५

                        विवेकानंद अमृत १४५ 

     एवढी श्रेष्ठ प्रज्ञा जवळ असूनही हिंदुराष्ट्राची अवनती का झाली ? मी तुम्हाला सांगतो की ती केवळ असुयेमुळे झाली . दुसऱ्यांचा द्वेष करणारे, दुसऱ्यांना आपल्याहून अधिक कीर्ती आणि मान मिळाला म्हणून जळणारे  जेवढे नतद्रष्ट या हिंदू जातीत जन्मले तेवढे अन्य कोणत्या जातीत क्वचितच जन्मले असतील . पाश्चात्य जगताचे वैशिष्टयच हे की, मत्सरभावनेचा पूर्ण अभाव . 

मंगळवार, २५ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४४

                     विवेकानंद अमृत १४४ 

     केवळ चाळीस लक्ष ब्रिटिशांनी तीस कोटी भारतीयांवर साम्राज्य गाजविलेच कसे ? याची मानसशास्त्रीय मीमांसा काय ? चाळीस लक्षांनी आपल्या इच्छाशक्ती एकवटल्या आणि त्यातून अतुल शक्ती निर्माण झाली . आणि जे तीस कोटी होते, त्यांच्या शक्ती मात्र विखुरलेल्या होत्या . संघटना, सर्व शक्तींचे एकत्रीकरण हेच उद्याच्या हिंदुस्थानच्या बांधणीचे प्राणसूत्र आहे . 

सोमवार, २४ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४३

                        विवेकानंद अमृत १४३ 

     हिंदुस्थानचे प्रश्न इतर कोणत्याही देशापेक्षा फार गुंतागुंतीचे, व्यापक आहेत . वंश, धर्म, भाषा आणि शासन यांनी मिळून राष्ट्र घडते . आपल्याला एकमेव अधिष्ठान आहे ते आपल्या पवित्र परंपरेचे, आपल्या धर्माचे . त्यावरच या राष्ट्राची पुन्हा उभारणी करायची आहे . 
     आपल्याकडे धर्मावर आधारलेली ऐक्यभावना अत्यंत आवश्यक आहे . संपूर्ण देशाला एकच धर्मचैतन्य व्यापून असले पाहिजे . मात्र ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध यांच्यातील एक-धर्माची कल्पना मला येथे अभिप्रेत नाही . 

रविवार, २३ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४२

                      विवेकानंद अमृत १४२ 

     आपल्या धर्मात अशी काही तत्वे आहेत की, जी सर्व पंथोपपंथांना मान्य आहेत . त्यांच्यात एरवी कितीही मतभेद असले तरी या तत्वांवर त्यांचे एकमत आहे . आणि तरीही या तत्वमंजुषेची व्याप्ती ध्यानात घेतली तर तिच्यात अपार विविधता आणि आपल्या विचारानुसार जीवन घडविण्याचे अपरंपार स्वातंत्र्य आहे असे आढळून येईल . या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक स्त्री-पुरुष आणि लहान मूल यांना ते समजू द्या व त्यांच्या जीवनातूनसुद्धा या तत्वाचा उत्कट अविष्कार घडूद्या .  

शनिवार, २२ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४१

                         विवेकानंद अमृत १४१ 

     एकूण आशियात आणि विशेषतः हिंदुस्थानात भिन्न वंश, भिन्न भाषा, भिन्न सामाजिक रचना, राष्ट्रीयत्वाच्या भिन्न भिन्न कल्पना यामुळे ज्या अडचणी निर्माण होतात त्या वितळवून टाकण्याचे सामर्थ्य केवळ धर्मात आहे . भारतीय मनाला आध्यात्मिक आदर्शांइतके दुसरे काहीही श्रेष्ठ वाटत नाही . भारतीय जीवनाचा तो प्राणस्वर आहे आणि तीच कार्याची सर्वात सुलभ दिशा आहे . हिंदुस्थानांत धर्म हेच अंतिम गंतव्य आहे, इतकेच नव्हे तर कार्याचे साधन सुद्धा तेच आहे . म्हणून मुळात धर्मात चैतन्य आणल्याखेरीज इतर काहीही करणे व्यर्थ होय . युगानुयुगे येथे अस्तित्वात असलेल्या धर्मशक्तींचे ऐक्य हीच भावी हिंदुस्थानचा निर्मितीची आधारशीला होय .  

शुक्रवार, २१ जून, २०१३

विवेकानंद अमृत १४०

                      विवेकानंद अमृत १४० 

      अन्नदान आपण पुष्कळच केले आहे . त्याबाबत आपल्या देशाच्या तोडीचा अन्य देश नाही . एखाद्या भिकारयाच्या घरी जरी गेले तरी आपल्यातल्या भाकरीचा अर्धा तुकडा काढून तो तुम्हाला देईल . अशा अद्भुत घटना फक्त हिंदुस्थानातच घडू शकतात . 

गुरुवार, २० जून, २०१३

विवेकानंद अमृत १३९

                       विवेकानंद अमृत १३९ 

      आपण खरे धैर्यशील आणि कणखर निश्चयाचे असू आणि सर्वान्तःकरणाने कामाला लागू, तर येत्या पंचवीस वर्षात सर्व प्रश्नांची उकल होईल आणि ज्याच्याशी झुंज घ्यावी लागेल असे काहीही प्रतिकूल शिल्लक राहणार नाही . सारे भारतीय विश्व पुनश्च आर्य होईल . 


बुधवार, १९ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३८

                      विवेकानंद अमृत १३८ 

     जो अध्यात्मविद्या देतो तो ते दान घेणाऱ्या जीवाची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करतो . जो भौतिकविद्या देतो तो ती विद्या घेनारयांना अध्यात्मविद्येचे दालन खुले करून देतो . त्यामुळे या दोन दानाच्या तुलनेत अन्य दाने- अगदी जीवनदानसुद्धा- कमी प्रतीचे ठरते . म्हणून आध्यात्मिक आणि भौतिक विद्येचे दान करण्यास शिकणे हे फार महत्वाचे आहे .  

विवेकानंद अमृत १३७

                     विवेकानंद अमृत १३७ 

      जो अध्यात्मज्ञान देतो, तो मनुष्यजातीचा फार श्रेष्ठ हितकर्ता होय . म्हणून आपण पाहतो की, श्रेष्ठ महात्म्यांनी सामान्य माणसाच्या आध्यात्मिक गरजा भागविण्याकडे लक्ष केंद्रित केले . कारण अध्यात्म हाच जीवनाचा पाया आहे . आध्यात्मिकदृष्ट्या समर्थ आणि संपन्न व्यक्ती ही तिची इच्छा असेल तर इतर कोणत्याही क्षेत्रात जयस्वी ठरू शकते . इतकेच काय, मनुष्याच्या भौतिक गरजा सुद्धा आध्यात्मिक शक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत . 

सोमवार, १७ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३६

                     विवेकानंद अमृत १३६ 

     ' भारतीय हे कधीच हिन्दुस्थानाबाहेर गेले नाहीत, विवेकानंद हे विदेशात गेलेले पहिलेच धर्मोपदेशक ' असे जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर त्यांना आपल्या वंशाचा इतिहास पुरेसा माहित नाही . हे येथे पुन्हा पुन्हा घडले आहे . जेव्हा जेव्हा विश्वाला अध्यात्मज्ञानाची तृषा होती तेव्हा तेव्हा अध्यात्माचा अक्षुण्ण ओघ हिंदुस्थानातून बाहेर पडला आणि सारे विश्व त्याने अध्यात्मसिंचित केले .  

विवेकानंद अमृत १३५

                          विवेकानंद अमृत १३५ 

     गेली कित्येक शतके आपल्या देशात धर्म ही एक अचेतन गोष्ट होऊन बसली आहे . त्यात पुन्हा चेतना ओतली पाहिजे . दैनंदिन जीवनात त्याचे स्फुरण असले पाहिजे . पूर्वकाळी आपला धर्म राजाधिराजांच्या प्रसादात आणि गरिब शेतकरयाच्या झोपडीत सर्वत्रच नांदताना दिसे व आताही तसेच घडले पाहिजे !
     धर्म हा संपूर्ण वंशाचा आरसा आहे . तो प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे . आपल्या भोवतीचे अवकाश, प्राणवायू हा जेवढा घेण्यास सुलभ, तेवढा धर्मही सुलभ झाला पाहिजे . बारीक बारीक पंथ करून, लहान-सहान मुद्यावरून भांडत बसल्याने हे होणार नाही . हिंदुत्वातील समान भूमिकेचे सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे . 

रविवार, १६ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३४

                       विवेकानंद अमृत १३४ 

     एखाद्या खोलीत शतकानुशतके अंधार आहे . तिथे आपण गेलो आणि रडत बसलो, ' किती बरे अंधार हा, किती बरे अंधार हा ! ' असे रडल्याने अंधार जाईल का ? प्रकाश आणा नि तत्क्षणी अंधार नाहीसा होईल ! हेच तत्व मनुष्य-सुधारणेमागे आहे . 
     या देशाचे आध्यात्मिक पुनरुत्थान करण्याचा हाच मार्ग आहे . परस्परांशी भांडण करणे वा लोक जे करीत आहेत त्यावर टीकास्त्र सोडणे यातून काहीच साधणार नाही . त्यांच्यापुढे चांगले तेवढे ठेवा . पहा किती उत्सुकतेने ते त्याचा स्वीकार करतील ! सर्व वंश जागृत होऊन उभा राहील आणि बाहु उभारून जे श्रेष्ठ आहे - तेजस्वी आहे त्याचा स्वीकार करील !   

शनिवार, १५ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३३

                        विवेकानंद अमृत १३३

     मनुष्याच्या ठिकाणी जे देवत्व आहे त्यावर श्रद्धा ठेवा . त्याच्या ठिकाणी दोष असतील, त्यांच्या हातून चुका होतील, तो कदाचित क्रूर आणि खुळ्या समजुतींना चिकटून बसलेला असेल . परंतु हे सारे काही त्याचा मूळ स्वभाव नव्हे . त्याच्यापुढे श्रेष्ठ आदर्श ठेवले गेले नाहीत म्हणून तो हीन राहिला आहे . 
      तुम्ही त्याला सत्यदर्शन घडवा . तेथेच तुमच्या कामाची परिसमाप्ती झाली . यापूर्वीच्या त्याच्या समजुती तो या सत्याच्या प्रकाशात पाहील आणि मग ते सारे हीण वितळून जाईल . प्रकाश झाल्यावर अंधार गेलाच पाहिजे आणि सत्याच्या दर्शनाने मनुष्यातील दिव्यत्व प्रकट झालेच पाहिजे . 


शुक्रवार, १४ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३२

                      विवेकानंद अमृत १३२


     आपल्या प्राचीन ग्रंथात अध्यात्माची जी रत्ने साठविली आहेत आणि ज्यांवर मुठभर लोकांची मालकी आहे ती रत्ने अरण्यात आणि मठात कोंडून पडली आहेत . ती बाहेर काढली पाहिजेत . संस्कृत भाषेच्या पोलादी पेटिकेत ती बंदिस्त आहेत . ती बाहेर काढून लोकभाषांमध्ये आणली पाहिजेत . घराघरातून पोहोचविली पाहिजेत . 

गुरुवार, १३ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३१

                          विवेकानंद अमृत १३१ 

     मी आयुष्यभर संस्कृतचा अभ्यास करतो आहे आणि तरीही प्रत्येक नवे संस्कृत पुस्तक म्हणजे मला आव्हानच वाटते ! यावरून संस्कृतच्या कठीणपणाची काही कल्पना येईल . ज्यांना संस्कृतचा सखोल अभ्यास करण्यासाठी वेळच मिळालेला नाही त्यांना ती तर किती कठीण वाटत असेल ! म्हणून संस्कृतांतील विचार लोकभाषांमध्ये आणले पाहिजेत . आणि त्याच वेळी संस्कृतचे शिक्षणही उत्तम चालले पाहिजे . कारण संस्कृत भाषेतल्या शब्दाशब्दात या वंशाचे सामर्थ्य व येथील ज्ञानगौरव यांचा प्रत्यय येतो .  

बुधवार, १२ जून, २०१३

विवेकानंद अमृत १३०

                            विवेकानंद अमृत १३० 

     भगवान बुद्ध लोकांची भाषा बोलत आणि लोकांना ती भाषा उमजे . त्यामुळे श्रेष्ठ धर्मतत्वांचा प्रसार वेगाने आणि सर्वदूर झाला हे खरेच . पण त्यासोबत संस्कृतचा प्रसार होणे सुद्धा आवश्यक होते . ज्ञानाचा प्रसार झाला पण त्याबरोबर संस्कृतीचा प्रसार झाला नाही . संस्कृतीमध्ये आक्रमणाशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य असते, निव्वळ ज्ञानात नसते .  

मंगळवार, ११ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२९

                      विवेकानंद अमृत १२९ 

     उपनिषदे हे आपले धर्मग्रंथ आहेत . हिंदुस्थानातला कोणताही पंथ असो : त्याला अखेर उपनिषदामध्येच कोठेतरी आधार शोधावा लागतो . तसा त्याने शोधला नाही तर तो पाखंडी ठरेल . म्हणून या देशातल्या आधुनिक हिंदूला जर कोणते अभिधान योग्य असेल तर ते ' वैदिक ' किंवा ' वेदान्तिन ' हे होय . आणि याच अर्थाने मी नेहमी ' वेदान्त ' हा शब्द वापरत असतो .   

सोमवार, १० जून, २०१३

विवेकानंद अमृत १२८

                        विवेकानंद अमृत १२८ 

     ' शक्ती ! शक्तीची उपासना ' हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो . हा एकच संदेश मी आयुष्यभर शिकत आलो आहे : ' हे बंधो, दुर्बल बनू नको ! शक्तीची उपासना कर ! ' 

रविवार, ९ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२७

                        विवेकानंद अमृत १२७ 

     गेल्या हजार वर्षात दौर्बल्य वाढविणाऱ्याच गोष्टी आपण करत आलो आहोत . इतक्या प्रमाणात की, जमिनीवरून सरपटत जाणाऱ्या गांडूळाची दशा आपल्याला आली आहे ; कोणीही यावे आणि आपल्याला पायाखाली चिरडावे !
     म्हणून माझ्या मित्रांनो, तुमच्या रक्ताचा भाऊ या नात्याने, तुमच्याशी ज्याच्या जीवन-मरणाची गाठ बांधली आहे असा एक आप्त म्हणून मी तुम्हाला सांगतो कि, आपण शक्तीची उपासना केली पाहिजे . उपनिषदे म्हणजे सामर्थ्याचा अक्षयकोषच आहेत . सर्व विश्व गदगदा हलवील असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे . सारे विश्व त्यांच्या संदेशाने चैतन्यमय होईल, सामार्थ्यमय होईल . 

शनिवार, ८ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२६

                         विवेकानंद अमृत १२६ 

     सर्वांना औपनिषदिक तत्वांचे आचरण करणे खरोखर शक्य आहे काय ? त्रिवार शक्य आहे ! कोळ्याला जर उमजेल की, आपल्यात ईश्वरी अंश आहे, तर तो आपले काम अधिक चांगल्या रीतीने करील . विद्यार्थी हा चांगला विद्यार्थी बनेल . वकील हा चांगला वकील बनेल . ज्याची त्याची आपापल्या कर्मातून प्रगती होत जाईल . 

शुक्रवार, ७ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२५

                     विवेकानंद अमृत १२५ 

     वेदांवर अधिकारवाणीने भाष्य केवळ एकानेच केले , तो म्हणजे वेद ही ज्याची सहजस्फुरणे आहेत असा भगवान श्रीकृष्ण . गीतेत त्याने सांगितले ते सर्व वर्णांसाठी, सर्व व्यावसायिकांसाठी आहे . ' धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम '  हे काही खरे नाही . चैतन्याने स्फुरणारी ती तत्वे गुहेतून बाहेर आलीच पाहिजेत . न्यायालयांमध्ये, विद्यालयांमध्ये त्यांचा संचार झाला पाहिजे . गरिबांच्या झोपड्यांमधून, मासे पकडणाऱ्या कोळ्यांच्या खोपटामधून ती निनादली पाहिजेत . 

गुरुवार, ६ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२४

                      विवेकानंद अमृत १२४


     आपण त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे पुत्र आहोत . ते अनंत, दिव्य चैतन्य आपल्या पेशीपेशीतून स्फुरत आहे . आपण क्षुद्र कसे असू ? आपण परिपूर्ण आहोत . आपण सर्व काही करण्यास तयार असले पाहिजे . ती क्षमता आपल्यात आहे व आपण ते केले पाहिजे .  

बुधवार, ५ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२३

                         विवेकानंद अमृत १२३

     माझ्या बंधूंनो ! हे उदात्त जीवनदायी तत्व आपल्या मुलांच्या मनामध्ये खोल रुजवा . त्यांना काही अद्वैतच शिकवायला पाहिजे असे काही नाही . तुम्हाला जो कोणता वाद त्यांना शिकवायचा असेल तो शिकवा . पण आत्म्याचे पूर्णत्व हे सर्व वादाचा पाया आहे . आपल्या पूर्वजांच्या ठायी अशी आत्मश्रद्धा होती . म्हणून संस्कृतीची श्रेष्ठ शिखरे ते पादाक्रांत करू शकले . ज्या दिवशी या देशातल्या लोकांची आत्मश्रद्धा नष्ट झाली त्या दिवसापासून आपल्या अवनतीला प्रारंभ झाला . स्वतःवरची श्रद्धा गमावणे म्हणजे परमेश्वराची श्रद्धा गमावण्यासारखेच आहे .    

मंगळवार, ४ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२२

                         विवेकानंद अमृत १२२ 

     ख्रिश्चन धर्मपंथात पाद्री आक्रोश करून सांगत असतात की, माणसा ! तू पापी आहेस . पण सर्वसामान्य युरोपियन वा अमेरिकन माणसाचे मन पहिले तर ते आत्मविश्वासाने फुललेले दिसते . 
     कोणाही इंग्लिश मुलाला विचारा . तो तुम्हाला सांगेल : ' मी इंग्लिश आहे . कोणतीही गोष्ट करण्याची ताकद माझ्याजवळ आहे . ' कोणताही युरोपियन वा अमेरिकन मुलगा तुम्हाला असेच सांगेल . आमची मुले असे म्हणतील काय ?  

सोमवार, ३ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२१

                            विवेकानंद अमृत १२१ 

     परमेश्वर अंतर्यामी आहे, परमेश्वर भूतमात्रात आहे असे हिंदुस्थानातील सर्वच पंथ मानतात . प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी पावित्र्य, परिपूर्णता आणि सामर्थ्य आहे असे सर्वच वेदांती म्हणतात . 

शनिवार, १ जून, २०१३

विवेकानंद अमृत १२०

                        विवेकानंद अमृत १२० 

     खरोखर अशी आत्मश्रद्धा निर्माण होणे अत्यंत हितकारक आहे . ही आत्मश्रद्धा दृढ करण्याचे शिक्षण जर आपल्याकडे दिले गेले असते आणि त्यानुसार जर आपल्या समाजात आचरण घडले गेले असते, तर आपल्यातील अनेक दोष आणि दुर्गुण, आपल्या वाट्याला आलेले दैन्य, हे भस्मसात झाले असते . इतिहासाची पाने उलगडून पहा . सर्व श्रेष्ठ स्त्रीपुरुषांच्यात जर कोणती बलवत्तर प्रेरणा आढळून येत असेल तर ती स्वतःच्या सामर्थ्याविषयींच्या परिपूर्ण विश्वासाची ! ' आपण मोठे होणार आहोत ' या विश्वासाने ते जगले आणि खरोखर महान झाले .