शनिवार, ३० मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ५७

                         विवेकानंद अमृत ५७ 

     प्रत्येक माणूस उभा राहतो आणि म्हणतो , ' माझा प्रेषित हाच एकमेव ! ' अशा माणसांना धर्म कशाशी खातात ते तरी कळले आहे काय ? बाष्कळ बडबड म्हणजे धर्म नव्हे . जडजम्बाळ सिद्धांत म्हणजे धर्म नव्हे . वाद- संवाद म्हणजेही धर्म नव्हे . हृदयाच्या अंतरंगात जो परमात्मा विराजमान आहे त्याचे दर्शन म्हणजे धर्म . जीवाचे परमात्मतत्वाशी - शिवाशी , आणि या विश्वातील त्याच्या उत्कट आविष्कारांशी नाते जुळणे म्हणजे धर्म ! 

विवेकानंद अमृत ५६

                              विवेकानंद अमृत ५६ 

     प्रत्येक युगात , प्रत्येक राष्ट्रात जे थोर पुरुष आणि स्त्रिया होऊन गेल्या त्यांना आदराने वंदन करा . ' साधू दिसती वेगळाले , परि ते स्वरूपी मिळाले ' अशी धारणा ठेवा . चैतन्याची-दिव्यत्वाची साक्षात अनुभूती जेव्हा येते तेव्हा मन विशाल होते , सर्वत्र त्या एकाच ईश्वराचे प्रकाशमय दर्शन होऊ लागते . 

शुक्रवार, २९ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ५५

                             विवेकानंद अमृत ५५ 

     मृत्युच्या जबड्यात प्रवेशतील , अथांग सागर पोहून पार करतील असे बुद्धिमान आणि धैर्यशील युवक मला हवेत ! ध्यासपूर्तीची धग त्यांच्या हृदयात हवी ! असे शेकडो युवक आणि युवती पाहिजेत . या एका ध्यासाचे वेडे व्हा . हेच वेड अनेकानेकांना लागू द्या . आणि मग त्यांची घडण , त्यांचे उदात्तीकरण आपण आपल्या पद्धतीने करू . 

गुरुवार, २८ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ५४

                          विवेकानंद अमृत ५४ 

     पावित्र्याच्या तेजाने तळपणारे , ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले , मृगेन्द्राचे सामर्थ्य नसात स्फुरत असलेले , दीनदलितांबद्धल हृदयात अपार करुन असलेले सहस्रो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल ! 

मंगळवार, २६ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ५३

                         विवेकानंद अमृत ५३ 

     मी भिन्न भिन्न देशांत प्रवास केल्यानंतर अशा निष्कर्षाला आलो आहे की , भव्य आणि चिरस्थायी कार्ये संघटनेशिवाय शक्य नाहीत . विकासाच्या ज्या टप्प्यावर आपण भारतीय आहोत त्या टप्प्यावर लोकशाही पद्धती सर्वस्वी अंगीकारणे हिताचे होणार नाही असे मला वाटते . लोकशाहीत सर्व सदस्यांच्या मतांना सारखेच महत्व असते आणि बहुमताने निर्णय होतो . पाश्चात्य देशांमध्ये हे योग्य आहे . आपल्या देशात जेव्हा शिक्षणाचा प्रसार होईल, व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे पाहण्याची, राष्ट्रहित आणि समाजहित जाणण्याची प्रगल्भता आपल्यात येईल तेव्हाच लोकशाही मार्गाने काम करता येईल . 

विवेकानंद अमृत ५२

                      विवेकानंद अमृत ५२ 

     कोणतेही कार्य तीन अवस्थांमधून पुढे जात असते . उपहास, विरोध आणि स्वागत . काळाच्या पुढे पाहणाऱ्या दृष्ट्यांचा नेहमी उपहास होतो . म्हणून विरोध, छळ या सर्वांचे स्वागतच आहे . आपण मात्र स्थिर असले पाहिजे . शुद्ध चरित असले पाहिजे आणि आपल्या मनात परमेश्वराच्या ठायी नितांत श्रद्धा पाहिजे . विरोधाच्या वावटळी या श्रद्धेने पाहता पाहता विरून जातील . 

सोमवार, २५ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ५१

                         विवेकानंद अमृत ५१ 

     नेतृत्व स्वीकारणे मोठे कठीण काम आहे . जो नेता होतो त्याला दासांचा दास व्हावे लागते . हजार प्रकारची मने सांभाळावी लागतात . जो अन्तःकरणपूर्वक सर्वांचा सेवक होऊ शकतो तोच खरा नेता होय . नेत्याजवळ स्वार्थ किंवा मत्सर याचा अंश सुद्धा असता कामा नये . जन्मजात गुण आणि संपूर्ण निःस्वार्थी बुद्धी यातूनच नेत्याचे व्यक्तिमत्व घडते . 

रविवार, २४ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ५०

                       विवेकानंद अमृत ५० 

     तुमच्या सहकाऱ्यांमध्ये अनेक उणीवा असतील . त्यांच्याकडे क्षमाशील वृत्तीने पहायला शिका . नेत्याने लक्ष लक्ष अपराध पोटात घालायची तयारी ठेवली पाहिजे . तुम्ही सर्वांवर निःस्वार्थ प्रेम कराल तर तुमचे सहकारीही तसेच प्रेम परस्परांवर करतील . 

शनिवार, २३ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४९

                       विवेकानंद अमृत ४९ 

     जे कोणी तथाकथित कार्यकर्तेपणाचा बडिवार माजवितात, त्यांच्यापेक्षा, ज्यांनी स्वतःला ईश्वरचरणी समर्पित केले आहे तेच खरे कार्यकर्ते होत . धर्मोपदेशकांच्या जथ्थ्यापेक्षा एखादी शुद्ध चारित्र्याची व्यक्ती ही धर्मजागरणाचे काम जास्त चांगले करू शकते . शुचिता आणि मौन यांतून निर्माण होणाऱ्या शब्दांना वज्राचे सामर्थ्य असते . 

शुक्रवार, २२ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४८

                               विवेकानंद अमृत ४८ 

     गुरुचे काम एवढेच की , पूर्णत्व आणि दिव्यत्व यांच्याकडे जाताना जी साधना करावी लागते , त्या साधनेत येणाऱ्या अडचणी दूर करणे . इतकेच करा आणि थांबा . पुढचे सारे करण्याचे दायित्व परमेश्वराकडे आहे . 

गुरुवार, २१ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४७

                       विवेकानंद अमृत ४७ 

     आपल्या स्नायूंमधून कार्यशक्तीचे जे स्फुरण होत असते त्याला आपण कार्य म्हणतो . पण जिथे विचार नाही तिथे कार्य कसे होईल ? म्हणून तुमचे अन्तःकरण रात्रंदिवस उच्च आदर्शाने, श्रेष्ठ स्फूर्तीने भरून राहूदे . म्हणजे तुमच्या हातून मोठे कार्य घडेल .  

बुधवार, २० मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४६

                          विवेकानंद अमृत ४६ 

     एक ध्येय स्वीकारा आणि तुमचे जीवन त्याच्या ध्यासात रंगून जाऊ दे ! ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचेच चिंतन भरून राहिलेले असू दे . मज्जा, स्नायू , नसा , शरीराचे अंग-प्रत्यंग या सर्वांतून त्या ध्येयाचेच स्फुरण असू दे . बाकी सारे काही सोडून द्या . हाच यशाचा मार्ग आहे . महान संत-सत्पुरुष अशा ध्यासातूनच घडले . बाकी सगळे नुसतेच वाचावीर आहेत ! 

मंगळवार, १९ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४५

                          विवेकानंद अमृत ४५ 

    महाबली हनुमान हा तुमचा आदर्श असला पाहिजे . श्रीरामचंद्राची आज्ञा होताच त्याने सागर पार केला ! त्याला जीविताची लेशमात्र तरी चिंता होती काय ? ' जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठं ' असे त्याचे वर्णन करतात . त्याने पूर्ण इंद्रियजय केला होता आणि तो विलक्षण प्रज्ञावंत होता . स्वामिसेवेचा  हा आदर्श तुम्ही स्वतःपुढे ठेवला पाहिजे . मग त्यातूनच जीवनातील इतर आदर्शांचा आविष्कार होईल . गुरूच्या आज्ञेचे निःशंक पालन आणि कठोर ब्रह्मचर्याचे आचरण हेच यशस्वितेचे रहस्य आहे . 

सोमवार, १८ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४४

                        विवेकानंद अमृत ४४ 

     भावना हेच जीवन आहे . भावनेची शक्ती, भावनेची उत्कटता यांच्यावाचून केवळ बौद्धिक कसरतींनी कोणी परमेश्वराकडे पोहोचत नाही . बुद्धी हि चैतन्यरहित अवयवांसारखी असते . तिच्यात जेव्हा भावनेचा संचार होतो तेव्हा ती गतिशील होते आणि कार्य करू लागते . जगाच्या पाठीवर सर्वत्र तुम्हाला असेच आढळेल . म्हणून तुम्ही सदैव मनात करुणा रुजविली पाहिजे . 

रविवार, १७ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४३

                         विवेकानंद अमृत ४३ 

     आपल्याला परमेश्वरासाठी काम करता येते यासाठी आपण स्वतःला धन्य समजले पाहिजे ! ' मदत ' आणि ' सहाय्य ' असली भाषाच सोडून द्या . तुम्ही कोणासही मदत करू शकत नाही . मदत करतो असे म्हणणेच मूर्खपणाचे आहे . आपल्याला ईश्वराच्या अर्चनेचे भाग्य लाभत आहे अशा विनीत भावनेने सर्व जगाकडे पहा. त्यातूनच संपूर्ण अनासक्तीचा जन्म होईल . हेच आपले कर्तव्य आहे . शिवभावाने जीवाची सेवा हेच कर्मयोगाचे रहस्य आहे . 

शनिवार, १६ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४२

                         विवेकानंद अमृत ४२ 

     मी कामाकरता काम करतो हे म्हणणे फार सोपे आहे, परंतु त्यासारखे आचरणात आणण्यास कठीण असे दुसरे काहीच नाही . ज्याने ते आचरणात आणले असा कोणी माणूस असेल तर त्याच्या दर्शनासाठी मैलोनमैल लोटांगणे घालीत जाण्यास माझी सिद्धता आहे . कामामागे काहीतरी इच्छा असतेच . पैशाची नसेल तर सत्तेची असते . सत्तेची नसेल तर आणखी कशाची तरी असेल . पण कुठेतरी काहीतरी प्रेरणा असतेच . फलाशा असतेच . हि फलाशाच दुःखाला जन्म देते . जेव्हा आपण स्वतःच्या मनाचे स्वामी बनतो तेव्हा केलेले काम अनासक्त असते आणि ते श्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती करून देते . 

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४१

                         विवेकानंद अमृत ४१ 

     कोणत्याही हेतुशिवाय केलेले काम; पैसा, संपत्ती, नाव, कीर्ती यांची अपेक्षा न ठेवता केलेले काम हेच सर्वोत्तम काम होय. असे काम जो करू शकतो तो बुद्धच होईल . त्याने केलेल्या कामात अशी शक्ती उत्पन्न होईल की, त्यायोगे सर्व जगाचे रूपच पालटेल . असा माणूस म्हणजे कर्मयोगाचा चालता बोलता आदर्शच होय .  

गुरुवार, १४ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ४०

                        विवेकानंद अमृत ४० 

     सागराचे पाणी सूर्य वाफेच्या रूपाने शोषून घेतो आणि पर्जन्यधारांच्या रूपाने पुन्हा त्या सागराला परत करतो . तुम्हीही असेच एक साधन आहात. पुन्हा देता यावे यासाठी तुम्ही घेता . म्हणून मोबदल्याची अपेक्षा न करता देत राहा . जेवढे जास्त द्याल तेवढे जास्त तुमच्याकडे परतून येईल . 

बुधवार, १३ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३९

                         विवेकानंद अमृत ३९ 

     एखादा चित्रकार चित्र रंगविताना इतका तन्मय होतो की, त्याला स्वतःचे सुद्धा भान राहात नाही . असा चित्रकारच श्रेष्ठ कलाकृतींना जन्म देऊ शकतो . ईश्वराशी जो योगबळाने एकरूप झाला तो आपले सर्व काम अत्यंत एकाग्रतेने करतो आणि व्यक्तिगत लाभाची काहीच अपेक्षा करीत नाही, अशा कर्मातून जगाचे नेहमी भलेच होत असते . वाईट काही होणे शक्यच नाही . गीता म्हणते की, आपली सर्वच कर्मे अशा रीतीने ' स्व ' ला विसरून झाली पाहिजेत . 

मंगळवार, १२ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३८

                               विवेकानंद अमृत ३८ 

     ' मी ' पणाच्या अंध, आग्रही भिंतीच्या आत आपण गुदमरून गेलो आहोत .  प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या संदर्भात पाहातो . ' मी ' हे केले . ' मी ' ते केले असे अहंकाराने म्हणतो . या क्षुद्र ' मी ' पणाचा त्याग करा . या दंभाचा त्याग करा . सर्वात अंतःकरणपूर्वक म्हणा, ' मी नव्हे; भगवंता, सारे काही तूच आहेस ! ' याची अनुभूती घ्या . अहंकारातून आपण निर्माण केलेले जग जर आपण त्यागले नाही तर स्वर्गाची इच्छासुद्धा आपल्याला धरता येणार नाही . 

विवेकानंद अमृत ३७

                          विवेकानंद अमृत ३७ 

     जो कोणत्याही गोष्टीच्या मागे धावत नाही, त्याच्या पायाशी साऱ्या गोष्टी चालत येतात. भाग्यलक्ष्मी ही चंचल असते . जो तिच्या मागे लागतो त्याची ती उपेक्षा करते. आणि जो तिच्याविषयी उदासीन राहातो त्याच्यावर ती संपत्तीची बरसात करते, कीर्तीची बरसात करते-नको नको वाटेल इतकी . 

रविवार, १० मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३६

                         विवेकानंद अमृत ३६ 

     कोणत्याही एका ध्येयाचा ध्यास घ्या . त्यासाठी जीवन अर्पण करा . ते ध्येय इतके मोठे असावे, इतके उत्कट असावे, त्यापुढे अन्य सर्व गोष्टी विरघळून जाव्यात . त्याशिवाय इतर कशाला जीवनात जागाच राहू नये . वेळच राहू नये . 

शनिवार, ९ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३५

                     विवेकानंद अमृत ३५ 

     साध्याइतकेच साधनांनाही महत्व दिले पाहिजे . यशाचे सर्व रहस्य त्यातच आहे . आपल्यामधील एक मोठा दोष असा की, ध्येयाने आपण इतके वेडावून जातो, आपल्या मानस-क्षितिजावर ते अशा काही आकर्षक दीप्तीने झळाळू लागते की, तपशिलाचा विचार आपण करूच शकत नाही . 

शुक्रवार, ८ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३४

                           विवेकानंद अमृत ३४ 

     महात्म्ये जन्माला येतात ते त्यांना जगाला काही विशेष संदेश द्यायचा असतो म्हणूनच . त्यांना काही कीर्तीची अभिलाषा नसते . पण त्यांचे अनुयायी मात्र त्यांचा संदेश बासनात गुंडाळून ठेवतात आणि त्यांच्या नावाने भांडतात असाच जगाचा इतिहास आहे . 

गुरुवार, ७ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३३

                           विवेकानंद अमृत ३३ 

     शारीरिक, मानसिक वा आत्मिक दुर्बलता ज्यामुळे येईल अशा कोणत्याही गोष्टीला थारा देऊ नका . धर्म हे मनुष्यातल्या स्वाभाविक शक्तीचे आविष्करण आहे . प्रचंड शक्तीचा स्त्रोत या लहानशा शरीरात लपलेला आहे . तो हळूहळू प्रकट होत आहे . 

विवेकानंद अमृत ३२

                       विवेकानंद अमृत ३२ 

     ज्याला खरोखरच जगाचा भार वाहायचा आहे, तो जगाला शांतपणे आशीर्वाद देतो . आपल्या मार्गावरून चालत राहातो . त्याच्या तोंडी धिक्कार किंवा टीका यांचा शब्दही नसतो . याचा अर्थ त्याच्या वाट्याला काही दुःख आलेले नसते असे नाही . पण ते त्याने स्वेछेने स्वीकारलेले असते . तो महात्मा आपल्या मार्गावरून आनंदाने पुढे चाललेला असतो. 

मंगळवार, ५ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत ३१

                           विवेकानंद अमृत ३१ 

     विचार हीच आपल्याला कार्यप्रवण करणारी शक्ती आहे . श्रेष्ठ विचारांनी मन भरून टाका . रोज त्यांचे श्रवण करा . नित्य त्यांचेच चिंतन करा . अपयश आले तर येऊ द्या . त्यात तर खरे जीवनाचे सौंदर्य आहे ! अपयशे नसतील तर जीवनाची चव काय राहिली ? जर झगडा नसेल तर जीवनात गोडी नाही . संघर्ष हे तर जीवनातले सार आहे . 

विवेकानंद अमृत ३०

                       विवेकानंद अमृत ३० 

     भूतकाळात तुमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या जर झाल्या नसत्या तर आज जे तुम्ही आहात तसे दिसला असता का ? त्या चुकांना दुवा द्या . त्यांनी तुमचे कल्याणच केले आहे . वेदनेचे स्वागत असो ! सुखाचे स्वागत असो ! आपल्या भाग्यात काय आहे याचा विचारच करू नका . आपल्या ध्येयाची कास धरा आणि जोमाने पुढे चला . 

सोमवार, ४ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत २९

                      विवेकानंद अमृत २९ 

     तुम्ही दिव्यत्वाचे अंश आहात . त्यामुळे श्रेष्ठतम गोष्टी तुमच्या चरणांशीच  आहेत . तुमचे स्वरूप इतके शक्तिमान आहे की, आकाशांतल्या सर्व तारकांचे तेज ओंजळीत घेऊन तुम्ही पिउन टाकाल . शक्तिमान व्हा ! सर्व अंधश्रद्धा दूर करा आणि मुक्त व्हा ! 

विवेकानंद अमृत २८

                            विवेकानंद अमृत २८ 

     प्रत्येक काम पवित्र आहे आणि स्वीकृत कार्यावर निष्ठा ठेऊन ते करणे ही श्रेष्ठ प्रकारची पूजा होय . आपल्यासमोर जे कर्तव्य दिसत असेल, आपल्या हातात जे काम असेल ते निष्ठेने केल्यामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते . अशा रीतीने आपली शक्ती वाढत गेली तर जीवनात आणि समाजात जे अत्यंत सन्माननीय समजले जाते असे दायित्व आपल्यावर सोपविले जाऊ शकेल . 

शनिवार, २ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत २७

                       विवेकानंद अमृत २७ 

     कुरकुर करण्याची वृत्तीच असली तर कोणतेच काम गोड लागत नाही . अशांच्या आयुष्याला अपयशाचा अभिशापच असतो . म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म उत्तम रीतीने करूया . त्यात सर्व चित्त ओतुया . मग खात्रीने आपल्यापुढचा मार्ग उजळेल . 

शुक्रवार, १ मार्च, २०१३

विवेकानंद अमृत २६

                         विवेकानंद अमृत २६ 

     या जगातील प्रत्येक गोष्ट ही वटवृक्षाच्या बीजासारखी आहे . दिसायला ते मोहरीएवढे दिसते , पण त्यात विराट वटवृक्ष लपलेला असतो . कोणत्याही कामात लपलेल्या श्रेष्ठ कार्याच्या शक्यता जो पाहू शकतो तो प्रज्ञावंत असे म्हटले पाहिजे .