शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २१०

                        विवेकानंद अमृत २१०

     मुसलमान या देशात आले तेव्हा त्यांनी किती शिपाई बरोबर आणले होते ? या देशावर राज्य करणारे ब्रिटीश तरी संख्येने किती आहेत ? चार रुपड्यासाठी आपल्या रक्तामांसाच्या भाऊबंदांचे गळे कापणारे मुर्दाड लोक या दुर्दैवी देशावाचून कोठे बरे सापडतील ? सातशे वर्षांच्या मुसलमानी अमलात सहा कोटी मुसलमान झाले आणि शंभर वर्षांच्या ब्रिटीश अमदानीत वीस लाख ख्रिस्ती झाले ! असे का घडले ? 

विवेकानंद अमृत २०९

                         विवेकानंद अमृत २०९

     शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण ! एवढेच याचे उत्तर ! युरोपातील नाना शहरात मी फिरलो . अगदी सामान्य माणसांनाही ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या मी पाहिल्या . त्या तुलनेत आपल्या देशातील दरिद्री बांधवांची स्थिती मनापुढे येई आणि मला आसवे अनावर होत . त्यांच्यात आणि आपल्यात असा फरक का ? केवळ शिक्षणामुळे . शिक्षणातून आत्मश्रद्धेचा जन्म होतो .  

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०८

                         विवेकानंद अमृत २०८

     आपल्या पुराणातल्या तेहतीस कोटी देवांवर आणि परकीयांनी आपल्यात घुसवलेल्या आणखी देवदेवतांवरही जरी तुमचा विश्वास असेल; पण स्वतःच्या ठायी मात्र अविश्वास असेल तर तुमच्या नशिबी मुक्ती लिहिलेली नाही . आधी स्वतःवर श्रद्धा ठेवा . त्या श्रद्धेच्या शिळेवर दृढपणे उभे राहा . सामर्थ्यसंपन्न व्हा ! आजची आवश्यकता जर काही असेल तर ती ही आहे .  

विवेकानंद अमृत २०७

                   विवेकानंद अमृत २०७

     मला स्पष्ट दिसत आहे की, ही कर्मप्रवणता आणि आत्मश्रद्धा माझ्या देशबांधवांमध्ये वेळीच उत्पन्न व्हायला हवी आहे . त्यावाचून गत्यंतर नाही . दृष्ट्या माणसांना येणाऱ्या तीन युगांचे दर्शन आधीच होत असते . श्रीरामकृष्णाच्या अवतरणापासूनच पूर्वेचे क्षितीज उगवत्या सूर्याच्या किरणांनी उजळलेले आहे . हळूहळू तो सूर्य माध्यान्हीचा होऊन साऱ्या देशाला वैभवशाली आणि प्रकाशमान करील . 

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०६

                            विवेकानंद अमृत २०६

     हिंदुस्थानचे पुनरुत्थान होणारच . ते विजयपदी विराजमान होणारच . पण तलवारीच्या जोरावर नव्हे; तर अध्यात्मशक्तीच्या बलाने ! संहाराचा उन्मत्त ध्वज घेऊन नव्हे , तर शांती आणि प्रीती यांचा, सन्यासवस्त्रांच्या अरुण उज्ज्वल रंगाचा ध्वज मिरवीत !

रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०५

                    विवेकानंद अमृत २०५

      स्वतःमधल्या देवत्वाला आवाहन करा . मग क्षुधा, तृष्णा, शीतोष्णादी सुखदुःखे तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत . विलासमय प्रासादात सारी सुखे पायाशी हात जोडून उभी असताना चवीला आपली थोडी धर्मचर्चा करावी हा हिंदुस्थानचा स्वभाव नाही . हिंदुस्थान धर्माकडे अधिक सखोलपणे, गांभीर्याने पाहतो . जे वरवरचे, कमअस्सल आहे ते त्याला लगेच कळते . म्हणून त्यागाला सिद्ध राहा . श्रेष्ठता प्राप्त करा . 

विवेकानंद अमृत २०४

                        विवेकानंद अमृत २०४

     त्यागावाचून श्रेष्ठ कार्ये सिद्धीस जात नाहीत . सर्व सुखविलास, उपभोग, कीर्ती, प्रतिष्ठा आणि मानमरातब यांना तिलांजली द्या . स्वतःच्या तन-मन-जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा की, ज्यावरून लक्षावधी लोक भवपार जातील . सर्व शुभशक्ती संघटित करा. श्रेयाची अपेक्षाच धरू नका . 

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०३

                     विवेकानंद अमृत २०३

     ज्या ध्वजाला तुम्ही अनुसरत असाल तो हिरवा आहे की निळा की तांबडा याची चिंता करू नका . सर्व रंगांच्या संगमातून शुभ्रतेचा-प्रीतीचा एकच एक रंग-एकच दिव्यद्युती निर्माण होऊ दे ! जीव ओतून आपण केवळ काम करायचे . फलाची चिंता करायची नाही ते आपोआप प्रकटेल .  


शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०२

                           विवेकानंद अमृत २०२

     मी भविष्यात डोकावण्याचा खटाटोप करत नाही . त्याची मला जरूरच वाटत नाही . मात्र एक उज्ज्वल दृश्य मला स्पष्टपणे दिसत आहे . ती चिरपुरातन मातृदेवता पुनरपी जागी झाली आहे . आपल्या श्रेष्ठ सिंहासनावर ती आरूढ झाली आहे आणि सर्वगौरवाने तळपत आहे . शांतिमंत्रांनी आणि आशिर्वचांनी तिच्या आगमनाची त्रिभुवनाला ग्वाही देऊ या . 





     

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०१

                       विवेकानंद अमृत २०१

     तुमच्याजवळ भाव आहे का ? बुद्धी आणि तर्क यांत काय आहे ? -- त्यांची धाव फार मर्यादित आहे . पण हृदयात मात्र स्फूर्तीचा उचंबळता झरा आहे . म्हणून हृदयाला सर्वाधिक महत्व आहे . देव भावाने भेटतो, बुद्धीने नाही ! बुद्धी फार तर आपल्यापुढचा मार्ग मोकळा करते . तिचे कार्य पोलीसासारखे आहे . पण पोलिस हे काही समाजाचे अनिवार्य अंग नव्हे . पोलिस गुन्हा करू देणार नाही, गोंधळ माजू देणार नाही . बुद्धीचेही काम एवढेच आहे . बुद्धीला डोळे नाहीत . हात आणि पायही नाहीत . ती स्वतःहून काहीच करू शकत नाही . भावना ही खरोखर चैतन्यमयी आहे . भावना विजेहून अधिक वेगाने काम करते . 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २००

                       विवेकानंद अमृत २००

     बुद्धीची आवश्यकता आहेच . ती नसेल तर आपण चुका करू, धडपडू , ठेचाळू , पण चुका टाळणे यापलीकडे बुद्धीचे काही काम आहे असे समजू नका . तिची मदत आहे, पण ती निष्क्रिय . तिचे स्थान दुय्यम . खरे काम तर भावनेचेच आहे-हृदयाचेच आहे . 

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९९

                        विवेकानंद अमृत १९९ 

     येथील असह्य वेदना तुमच्या रक्तात मिसळून तुमच्या धमन्यातून वहात तुमच्या हृत्स्पंदांशी एकरूप झाली आहे का ? या वेदनेने तुम्ही वेडेपिसे झाले झाला आहत का ? ती दूर करण्यासाठी यश-कीर्ती, पत्नी-मुले, इतकेच नव्हे तर सर्वस्वाचे समर्पण करण्याची तुमची तयारी आहे काय ? 

रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९८

                       विवेकानंद अमृत १९८

     शुद्ध प्रेमाने साध्य होत नाही असे काय आहे ? विश्वातील सारी रहस्ये उलगडणारी गुरुकिल्ली प्रेमात आहे . म्हणून सुधारणा करण्याची आकांक्षा धरणाऱ्या माझ्या देशप्रेमी मित्रांनो ! आधी निरपेक्ष प्रेम करायला शिका . देव-देवता आणि ज्ञानी ऋषी यांची ही लक्षावधी मुले पशुतुल्य जिणे जगत आहेत . हे पाहून तुमच्या काळजाला वेदना होतात का ? शतकानुशतके उपाशी-अर्धपोटी राहणाऱ्या या लक्षावधी बांधवाबद्धल तुमच्या पोटी आच आहे का ? या भूमीला घेरून असलेले अज्ञान तुम्हाला बेचैन करते काय ? त्यामुळे तुम्हाला झोपही लागत नाही असे होते का ?   

विवेकानंद अमृत १९७

                         विवेकानंद अमृत १९७

     विपन्नता आणि अज्ञान यांच्या गर्तेत पिचणाऱ्या आपल्या लक्षावधी बांधवांसाठी कोणाचे काळीज तुटते काय ? आपणही माणसे आहोत हेच ते विसरले आहेत व परिणामतः गुलामीचे जिणे जगताहेत . जाणते लोक हे सारे पाहताहेत, पण त्याचे खापर त्यांनी हिंदूधर्माच्याच माथी मारले आहे . आणि या विपन्न बांधवांना सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धर्मावर कुऱ्हाड घालणे असे ते समजतात .   
     कृपा करून मी काय म्हणतो ते ऐका . परमेश्वर कृपेने मी यातले रहस्य शोधून काढले आहे . हा दोष धर्माचा नव्हेच नव्हे . याच्यावर कसले खापर फोडू नका . 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९६

                           विवेकानंद अमृत १९६

      खरे म्हणजे या धर्माने आपल्याला शिकविले आहे की, प्रत्येक जीव हे तुझ्या ठायी असलेल्या आत्म्याचेच दुसरे रूप आहे . तुमच्याच त्या प्रतिकृती आहेत . परंतु या सांगाव्याचे आचरण आपल्या हातून घडले नाही . कारण सह्भावाचा-ओलाव्याचा अभाव ! दरिद्री, दुःखी, पतित यांच्याशी जिव्हाळ्याने कसे वागावे हे तुम्हाला शिकविण्यासाठी परमेश्वराने भगवान बुद्धांचा अवतार घेतला . 

विवेकानंद अमृत १९५

                         विवेकानंद अमृत १९५ 

     मानवाच्या श्रेष्ठतेचा उदघोष एवढ्या कंठरवाने हिंदू धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माने केलेला नाही . आणि दीनदलितांची धर्माच्या नावाने पिळवणूक करण्याइतकी परमकोटीची हीनताही जगातल्या अन्य कोणत्या धर्माने दाखविलेली नाही . परमेश्वराने मला सांगितले आहे की, धर्म निर्दोष आहे ; दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल ! त्यांनी ढोंगीपणाने पारमार्थिकाची आणि व्यावहारिकाची फारकत केली आहे . 

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९४.

                        विवेकानंद अमृत १९४

     या मृतप्राय समाजात तुम्ही नवे चैतन्य ओतू शकाल ? इथली स्फूर्ती मेली आहे , भविष्याची सर्व आशा निमाली आहे . जे कोणी भले करायला जातील त्यांच्यावरच उसळून उलटण्याची मनोवृत्ती येथे आहे . लाथा झाडणाऱ्या चिडखोर मुलाला औषध पाजणाऱ्या वैद्याची भूमिका तुम्हाला करावी लागेल . आहे तयारी ? 

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९३

                         विवेकानंद अमृत १९३ 

     मी असे ऐकले आहे की, जपानी मुलींची अशी समजूत असते की, आपल्या बाहुल्यांवर खूप जीवापासून प्रेम केले तर त्या जिवंत होतात . म्हणून जपानी मुलगी आपल्या बाहुलीला जीवापाड जपते . माझीही अशी श्रद्धा आहे की भुकेकंगाल, निर्धन, अविवेकी, पतित, भांडखोर आणि मत्सरी अशा या समाजावर जर का कोणी सर्वांतःकरणपूर्वक प्रेम करतील तर हा समाज जागृत होईल . विशाल अंतःकरणाचे शतावधी स्त्री-पुरुष जर सर्व जीवनभोगांचा त्याग करून त्यांच्या सर्व शक्ती आपल्या लक्षावधी देशबांधवांच्या कल्याणार्थ समर्पण करतील तर अवनती आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात खोल खोल जात चाललेला हा समाज खात्रीने वर येईल .   

विवेकानंद अमृत १९२

                      विवेकानंद अमृत १९२ 

     संपूर्ण तादात्म्यतेची भावना ही झाली पहिली पायरी. नंतर परिस्थितीवर योग्य तोडगा शोधून काढला पाहिजे . आपल्या परंपरेतील जुन्या कल्पना म्हणजे तुम्हाला निव्वळ अंधश्रद्धा वाटत असणे शक्य आहे . पण त्यात सत्याचे सुवर्णकण लपलेले आहेत .  

रविवार, ११ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९१

                         विवेकानंद अमृत १९१ 

     केवळ पोकळ गप्पांमध्ये शक्तीचा अपव्यय करण्याऐवजी तुम्ही एखादा प्रत्यक्ष उपाय शोधून काढला आहे काय ? हे लोक जिवंतपणी ज्या यमयातना भोगीत आहेत त्या हलक्या करण्यासाठी सांत्वनाचे चार गोड शब्द तुम्ही त्यांच्याशी बोलला काय ? की केवळ टीकाच करता ? 
     जर तुम्ही मधुर शब्द बोलत असाल तर ती दुसरी पायरी झाली . आणखी एक गोष्ट आवश्यक आहे . हे सारे तुम्ही का करता ? पैसा, कीर्ती किवा सत्ता यांच्या लालसेपोटी हे कर्म नाही याविषयी तुमची खात्री आहे ना ? आपला हेतू शुद्धच पाहिजे .  

शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९०

                           विवेकानंद अमृत १९० 

     जाणते लोक निंदा करोत वा वाखाणोत; लक्ष्मी घरी स्थिर राहो वा अन्यत्र जावो; मृत्यू आज येवो वा अनेक युगांनी येवो - धैर्यवान पुरुष सत्यमार्गावरून तिळमात्र ढळत नाहीत . असा कणखरपणा तुमच्या ठायी आहे ? 
     एवढ्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्या तर तुमच्यापैकी प्रत्येकजण अद्भुत कार्य करू शकेल . वृत्तपत्रात मोठमोठे लेख लिहिणे, लांब - लांब व्याख्याने देणे याची काय आवश्यकता ? तुमचे भावच तुमच्या मुद्रेवर विलसू लागतील . तुम्ही गुहेत राहत असाल तर पाषाणशिलांना भेदून तुमचे विचार जगभर पोहोचतील . शतकानुशतके घुमत राहतील . 

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८९

                         विवेकानंद अमृत १८९

     समर्पण हे काही एका दिवसाचे काम नाही . मार्ग तर भयंकर काट्याकुट्यांनी भरलेला आहे . पण जो पार्थाचा-अर्जुनाचा सारथी झाला, तो आपल्यालाही मार्ग दाखवायला सिद्ध आहे . त्याच्यावरील श्रद्धेची एक चिंगारी हिंदुस्थानच्या शतकानुशतकांच्या व्यथेवर टाकताच ती पर्वतप्राय व्यथा क्षणार्धात भस्म होईल .  

विवेकानंद अमृत १८८

                      विवेकानंद अमृत १८८ 

     जो अकिंचन गोपालांचा सखा झाला, अंत्यज गुह्काला ज्याने स्नेह्भराने आलिंगन दिले ., बुद्धावतारात भल्याभल्यांची निमंत्रणे बाजूला सारून ज्याने एका वेश्येचे निमंत्रण स्वीकारले आणि तिचा उद्धार केला त्या भगवान पार्थसारथीच्या मंदिरात जा . त्यांच्या शुभचरणी नतमस्तक व्हा आणि आपले सारे जीवन समर्पण करा ! भगवान पुनः पुन्हा ज्यांच्यासाठी अवतार घेतात त्यांच्या कारणी ते जीवन लागू द्या ! दीन, पतित, अत्याचारित यांचा तो कैवारी . तुम्हीही प्रतिज्ञा करा की, दिवसेंदिवस गर्तेत चाललेल्या त्या पददलीतांसाठी आम्ही आपली जीवने अर्पण करू !   

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८७

                         विवेकानंद अमृत १८७ 

     उठा ! या महान कार्याच्या पूर्ततेसाठी सिद्ध व्हा ! त्यासाठी महत्तमत्व अंगी बाणले पाहिजे . आपण प्रकाशाचे पुत्र, अमृताचे वारस आहोत ! परमेश्वराचे पुत्र यशस्वी होणारच ! या धर्मयुद्धात शेकडो योद्धे कामी येतील . त्यांची जागा घेण्यासाठी शेकडो पुढे येतील . मला कदाचित याचि देही यशःप्राप्ती पाहता येणार नाही . पण माझ्यानंतरचे लोक ही धुरा खांद्यावर घेतील . 

विवेकानंद अमृत १८६

                        विवेकानंद अमृत १८६ 

     आपल्याला दुखःनिदान झाले . उपायही सापडला . आता आवश्यकता आहे श्रद्धेची . जे तथाकथित श्रेष्ठ नि श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका . तर्ककर्कश लेखणी चालविणाऱ्यांची खुशाल उपेक्षा करा . त्यांच्या हृदयशून्य वृत्तपत्रीय चिकित्सेकडे ढुंकूनही पाहू नका . 
     ज्वलंत श्रद्धा आणि ज्वलंत सहानुभाव एवढेच महत्वाचे आहे . श्रद्धा, श्रद्धा ! केवळ आत्मश्रद्धा हवी . ईश्वरश्रद्धा हवी . साऱ्या महत्तमत्वाचे रहस्य या श्रद्धेत आहे .  

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८५

                      विवेकानंद अमृत १८५ 

     ज्याचा स्वतःवरच विश्वास नाही तो नास्तिक होय . ते  सुंदर कठोपनिषद तुम्ही वाचले आहे का ? एका राजाने एकदा एक मोठा यज्ञ सुरु केला . यज्ञात खरे म्हणजे सर्वोत्तम वस्तूंचे दान करायचे असते . पण या राजाने वांझ गायी आणि निरुपयोगी घोडे यांचे दान करायला सुरुवात केली . हे पाहून नचिकेताच्या मनात श्रद्धेचा उदय झाला . श्रद्धा हा शब्द नीट समजून घेतला पाहिजे . हा एक अद्भुत शब्द आहे . नचिकेताच्या मनात श्रद्धेचा उदेजल्याबरोबर काय झाले ? तो स्वतःशीच म्हणाला,


बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यमः |
किं स्विद्यमस्य कर्तव्यं यन्मया द्य करिष्यति ||  

     मी कितीकांहून श्रेष्ठ आहे . काही थोडे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे खरे, पण मी अगदीच काही शेवटचा नाही . मी खात्रीने काही करू शकतो .  

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८४

                       विवेकानंद अमृत १८४ 

     नचिकेताने ठरविले की, आपल्या मनात जो प्रश्न आहे त्याची उकल करून घ्यायची . हा प्रश्न होता मृत्युच्या रहस्याचा . आणि तो केवळ यमराजाकडे जाऊनच सोडविणे शक्य होते . आणि हा मुलगा गेला की यमराजाकडे ! धैर्यशील नचिकेत मृत्युराजाच्या दारात तीन दिवस धरणे धरून बसला होता . त्याची आकांक्षा कशी पूर्ण झाली हे आपण जाणताच . 
     अशी श्रद्धा आपल्यात प्रविष्ट होऊ दे . पाश्चिमात्याकडे जे भौतिक सामर्थ्य आपल्याला दिसते ते त्यांनी स्वठ्च्या शरीरबलावर श्रद्धा ठेवल्यामुळे त्यांना प्राप्त झाले आहे . तुम्ही आत्मबलावर श्रद्धा ठेवा आणि पहा किती पटीने ती श्रद्धा कार्यान्वित होते ती ! 




शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८३

                          विवेकानंद अमृत १८३ 

     बस्स !अशी श्रद्धा मला हवी आहे . अशी श्रद्धा तुमच्यात उदेजू दे . ही श्रद्धा मिळविणे हेच मोठे आह्वान आहे . गांभीर्याचा अभाव, ज्या त्या गोष्टींची टिंगल करणे हा एक भयंकर रोग या देशाच्या रक्तात शिरला आहे . झडझडून झाडून टाका तो . शक्तिमान बना ; श्रद्धावान बना, मग सारे यश तुमच्या पायाशी चालत येईल . 

विवेकानंद अमृत १८२

                         विवेकानंद अमृत १८२

      एकदा कामाला भिडा तर खरे, मग तुम्हाला कळेल की, अशा विलक्षण शक्तीचा आपल्यात संचार होत आहे की ती पेलून धरणे कठीण ! दुसऱ्यासाठी केलेली छोटी गोष्टसुद्धा आपल्यात एक शक्ती जागवित असते . दुसऱ्यांचे अल्पसे शुभ चिंतिले तरीही हृदयात वनराजाचे सामर्थ्य जागृत होते . 

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८१

                         विवेकानंद अमृत १८१ 

     मुळात आवश्यक गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे त्याग . सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कुणीही लोकहितार्थ स्वतःला झोकून देऊ शकत नाही . असा परित्यागीच सर्वांकडे समदृष्टीने पाहू शकतो आणि सर्वांची समभावाने सेवा करतो .  


विवेकानंद अमृत १८०

                         विवेकानंद अमृत १८० 

     वैराग्य संपन्न व्हा . तुमच्या पूर्वजांनी श्रेष्ठ तत्वांसाठी जगताचा त्याग केला . आजसुद्धा स्वतःच्या मुक्तीसाठी जगताचा त्याग करणारे लोक आहेतच . पण मी म्हणतो सर्वस्वाचा त्याग करा . मुक्तीच्या कांक्षेचाही त्याग करा आणि सेवेला जीवन समर्पित करा .