शुक्रवार, ३१ मे, २०१३

विवेकानंद अमृत ११९

                       विवेकानंद अमृत ११९ 

     आज व्यावहारिक वेदांताची गरज आहे . आता तो रहस्यरूप राहून चालणार नाही . केवळ संन्यासी आणि तपस्वी यांच्या गुहांमध्ये राहून चालणार नाही . लोकांच्या दैनंदिन जीवनात तो स्फुरला पाहिजे . सम्राटाच्या प्रासादामध्ये, गोरगरिबांच्या झोपड्यांमध्ये सर्वत्र त्याचे आचरण घडले पाहिजे . 

विवेकानंद अमृत ११८

                        विवेकानंद अमृत ११८ 

     आत्मश्रद्धा अन्तःकरणात उदेजू द्या . तुम्हाला संपत्ती पाहिजे असेल, तर सर्वस्वाने त्यासाठी प्रयत्न करा . संपत्ती तुमच्या दारी चालत येईल . तुम्हाला विद्वान व्हायचे असेल तर विद्येची उत्कट उपासना करा . तुम्ही श्रेष्ठ विद्वान व्हाल . तुम्हाला मुक्ती हवी असेल तर प्रखर अध्यात्मसाधना करा . तुम्ही मुक्तच व्हाल ! चिरंतन आनंदाचे, निर्वाणाचे तुम्ही अधिकारी व्हाल . 

गुरुवार, ३० मे, २०१३

विवेकानंद अमृत ११७

                    विवेकानंद अमृत ११७ 

     पाश्चात्य आणि आपण यांच्यात असलेला महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत आहे आणि आपल्यात नाही संस्कृती आणि शिक्षण हे पाश्चात्य देशांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचले आहे; आपल्याकडे पोहोचलेले नाही . हिंदुस्थानातील आणि अमेरिकेतील उच्चवर्णीयांच्यात फारसा फरक नाही . पण या दोन देशांतल्या बहुजन समाजांमध्ये भयानक मोठी दरी आहे . ब्रिटिशांना हिंदुस्थान जिंकणे इतके सहज का शक्य झाले ? कारण त्यांच्यातील राष्ट्रभावना जागृत आहे आणि आपल्यातली नाही .  

विवेकानंद अमृत ११६

                       विवेकानंद अमृत ११६ 

     आपल्याकडील एखादा महापुरुष निधन पावला तर दुसऱ्याचा अवतार होण्यासाठी आपल्याला शतकानुशतके वाट पहावी लागते . त्यांच्याकडे आज एक गेला की, लगेच त्याच्याजागी दुसरा उभा रहातो .आपल्याकडे मात्र महापुरुषांची वाण पडते . असे का ? कारण त्यांच्याकडे महापुरुषांच्या निर्माणाला मोठे क्षेत्र आहे आणि आपल्याकडे मात्र अगदीच मर्यादित क्षेत्र आहे . ज्यांची लोकसंख्या तीन, चार, सहा कोटी आहे अशा देशांच्या तुलनेत आपल्या तीस कोटींच्या देशात महापुरुषासाठी मर्यादित क्षेत्र आहे हे म्हणणे चमत्कारिक वाटेल . पण ते खरे आहे . कारण त्या देशांमध्ये सुशिक्षित स्त्रीपुरुषांची संख्या फार मोठी आहे . आपल्या देशातील ही त्रुटी फार गंभीर आहे . ती भरून काढली पाहिजे . तळागाळातील माणसांना शिक्षण देऊन वर आणले तरच हे राष्ट्र ' राष्ट्र ' म्हणून उभे राहू शकेल .     

बुधवार, २९ मे, २०१३

विवेकानंद अमृत ११५

                        विवेकानंद अमृत ११५ 

     आपण वाचतो, ' मातृदेवो भव । पितृदेवो भव । ' आईला देव मानणारे व्हा, वडिलांना देव मानणारे व्हा . मी म्हणतो, ' दरिद्रदेवो भव । मूर्खदेवो भव । ' ते दरिद्री, ते अशिक्षित, ते अडाणी, ते दैन्यवाणे लोक तुमची दैवते होऊ द्यात . त्यांची सेवा हाच परमधर्म होऊद्या .  

विवेकानंद अमृत ११४

                      विवेकानंद अमृत ११४

     आज आपल्याला जे शिक्षण मिळते त्यात काही थोड्या चांगल्या गोष्टी आहेत हे खरे . पण त्यात घातक गोष्टी एवढ्या आहेत कि, त्या चांगल्या गोष्टी कुठल्याकुठे विरून जातात . हे काही मनुष्य-घडणीचे शिक्षण नव्हे . उलट हे मनुष्यत्व खच्ची करणारे शिक्षण आहे ! ते मृत्यूहून भयानक आहे ! मूल पहिल्या दिवशी शाळेत जाते आणि काय शिकते ? - तर त्याचा बाप मूर्ख होता, त्याचा आजा भ्रमिष्ट होता आणि त्याचे गुरु दांभिक आहेत . त्याचे धर्मग्रंथ हे असत्याने ठासून भरलेले आहेत .! असे मूल तारुण्यात प्रवेश करते तेव्हा खच्ची करणाऱ्या कल्पना, कणाहीन विचार आणि प्रेरणाशून्यता यांचे ते बेंगरूळ गाठोडे होते !    

मंगळवार, २८ मे, २०१३

विवेकानंद अमृत ११३

                           विवेकानंद अमृत ११३ 

     आमच्या देशात महापुरुष जन्माला आले हे आम्हाला कधी शिकविले जाते काय ? स्फूर्तीदायक अशा एकातरी गोष्टीचा आमच्या शिक्षणात अंतर्भाव असतो काय ? साधे आपले हातपाय कसे हलवावेत हे सुद्धा आम्हाला शिकवले जात नाही . ब्रिटीश राजघराण्याच्या नामावळ्या आणि आकडेवारी आम्ही धडाधड घोकतो. पण आमच्या येथे होऊन गेलेल्या महापुरुषांबद्दल आपल्याला काही माहिती असते काय ? अशा शिक्षणातून दुबळे, कणाहीन तारुण्य निर्माण होईल नाहीतर काय होईल ? 

विवेकानंद अमृत ११२

                          विवेकानंद अमृत ११२ 

     शिक्षण म्हणजे अपरिपक्व आणि गोंधळ उडवून देणाऱ्या कल्पनांचे आणि माहितीचे गाठोडे जन्मभर गोळा करणे नव्हे. चैतन्याने मुसमुसलेले, चारित्र्य घडविणारे, पुरुषार्थ प्रदान करणारे ते शिक्षण ! शेकडो ग्रंथ डोक्यात कोंबण्यापेक्षा तुम्ही अगदी थोड्या कल्पना खरोखर आत्मसात केल्यात आणि त्या जगून दाखविल्यात तर ते खरे शिक्षण . म्हणून या देशातील अध्यात्मिक आणि लौकिक शिक्षण आपल्याच हातात असले पाहिजे . राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती त्या शिक्षणातून झाली पाहिजे . त्यासाठी अनुरूप ती साधने आपण स्वतः घडवली पाहिजेत .   

सोमवार, २७ मे, २०१३

विवेकानंद अमृत १११

                          विवेकानंद अमृत १११ 

     शेकडो समर्पित संन्यासी आपल्या देशात धर्मशिक्षण देत गावोगाव फिरत आहेत . त्यांच्यातील काहींनी भौतिक शिक्षणसुद्धा दिले पाहिजे . ह्या संन्याशांनी केवळ अध्यात्म- विद्यांचेच नव्हे, तर ऐहिक विद्येचेही दान करीत घरोघर गेले पाहिजे.  

रविवार, २६ मे, २०१३

विवेकानंद अमृत ११०

                         विवेकानंद अमृत ११० 


     तळागाळातल्या समाजाला तुम्ही विचार द्या . जगात काय चालले आहे याची त्यांना जाण द्या . मग त्यांच्या मुक्तीचा मार्ग तेच शोधून काढतील . विविध रसायने एकत्र करणे हे आपले काम . निसर्गनियमानुसार  त्यातून स्फटिक तयार होतीलच . आपण त्यांचे विचार जागरण करा . मग स्वतःच्या उन्नतीचा मार्ग ते स्वतःच शोधतील . लोकशिक्षणाचा अर्थ  आहे . 

विवेकानंद अमृत १०९

                        विवेकानंद अमृत १०९ 

     येथे एक नवे केंद्र उत्पन्न झाले पाहिजे . नवा जीवनादर्श घडला पाहिजे . नवा मार्ग दाखविणारे नवे देवमानव उदयास आले पाहिजेत . अशा नव्या गाभ्याभोवती सर्व शक्ती एकत्रित झाल्या पाहिजेत . त्या महाप्रवाहाने सर्व समाज पुनीत झाला पाहिजे . त्यात सर्व दोष वाहून गेले पाहिजेत .   

मंगळवार, २१ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०८

                      विवेकानंद अमृत १०८ 

     लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील . त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळीची मुळीच गरज नाही . 

विवेकानंद अमृत १०७

                    विवेकानंद अमृत १०७ 

     या राष्ट्राच्या आध्यात्मिक, लौकिक आणि भौतिक संपदेची सखोल जाण आपल्याला असली पाहिजे . त्याचीच स्वप्ने पडली पाहिजेत, त्याचाच उच्चार झाला पाहिजे . त्याचेच चिंतन आणि त्याचेच आचरण झाले पाहिजे . असे झाल्याखेरीज या समाजाला गती नाही . यासाठी पाहिजे संघटना .  

रविवार, १९ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०६

                     विवेकानंद अमृत १०६ 

     पैसा इतका महत्वाचा नाही . तो कुठूनतरी येईल . माझ्या आयुष्यातले गेले तप असे गेले आहे की, दुपारचे जेवण कुठून येईल हे मला माहित नसे . पण मला जो पैसा आणि साधने हवी आहेत ती येतीलच . कारण ती माझी दास आहेत . मी त्यांचा दास नाही . काळजी करू नका . पैसा आणि साधने येतीलच येतील . 

शनिवार, १८ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०५

                       विवेकानंद अमृत १०५ 

     तुमच्यातच सर्व शक्ती वास करीत आहेत अशी श्रद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात जागी होऊ दे ! मग तुम्ही सर्व हिंदुस्थान चैतन्याने भारून  टाकाल . आणि त्यानंतर बंधुंनो ! जगातील सर्व राष्ट्रांमध्ये जाल आणि त्या त्या राष्ट्रांच्या घडणीमध्ये हिंदू तत्वांचे फार मोठे योगदान कराल ! हिंदुस्तानातील आणि अन्यत्र असलेल्या प्रत्येक वंशाचे चैतन्य आपण जागविले पाहिजे. यासाठी मला युवक पाहिजे आहेत .  

शुक्रवार, १७ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०४

                       विवेकानंद अमृत १०४

     माझा युवा पिढीवर फार विश्वास आहे . या युवकांमधूनच मला हवी असलेली माणसे मिळतील . सिंहाच्या हृदयाची ही माणसे सर्व प्रश्नांवर उत्तरे शोधून काढतील . मी ध्येय निश्चित केले आहे आणि त्याला जीवन वाहिलेले आहे . जर माझ्या आयुष्यात मला यश मिळाले नाही तर माझ्याहून श्रेष्ठ कोणीतरी पुढे येईल आणि माझे कार्य यशस्वी करून दाखवील . 

गुरुवार, १६ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०३

                            विवेकानंद अमृत १०३

     जे सुकुमार आहे; शक्तीपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे तेच परमेश्वराजवळ जाते असे वेदवचन आहे . म्हणून उठा ! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे . जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले असे झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंत निश्चय करा ! उठा, काम करा !नुकतेच उमललेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच ती शुभ घडी आहे .  

विवेकानंद अमृत १०२

                         विवेकानंद अमृत १०२ 

     श्रेष्ठ आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि त्यासाठी सर्वस्व समर्पण करा . हाच दृढ निश्चय होऊ दे ! सुजनांच्या रक्षणासाठी जो पुनः पुन्हा अवतार धारण  करता झाला तो भगवान श्रीकृष्ण आपल्याला आशीर्वाद देवो . आपली इप्सिते पूर्ण करो . 

   उत्तिष्ठ्त ! जागृत ! प्राप्य वरान् निबोधत !

उठा ! जागे व्हा ! आणि ध्येयसिद्धी झाल्याविना थांबू नका ! 

बुधवार, १५ मे, २०१३

विवेकानंद अमृत १०१

                          विवेकानंद अमृत १०१ 

     फरिश्ता हा प्राचीन मुसलमान इतिहासकार सांगतो की मुसलमान पहिल्याने या देशात आले त्यावेळी हिंदूंची संख्या साठ कोटी होती . आज आपण अवघे वीस कोटी उरलो आहोत . पुन्हा हिंदुत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या एकाने कमी करतो एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो .  

रविवार, १२ मे, २०१३

विवेकानंद अमृत १००

                          विवेकानंद अमृत १०० 

     मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मांतरीतांपैकी बहुतेकांना तलवारीच्या जोरावर बाटविले गेलेले आहे . आजचे धर्मांतरित हे त्यांचेच वंशज आहेत . अशांना दूर लोटणे केव्हाही हिताचे होणार नाही . तुम्ही विचाराल की, ' जे निखालस परजातीचे, परधर्माचे असतील त्यांचे काय ? ' भूतकाळात असे कित्येक परजातीय आपल्या धर्मात स्वीकारले गेले आहेत . अजूनही हा प्रघात आहेच . आतापर्यंत आपल्या सीमेवरच्या अनेक रानटी टोळ्यांना आपण आत्मसात केले . मुसलमानापूर्वीच्या सर्व परकीय आक्रमकांनाही आपण आत्मसात केले आहे .  

शनिवार, ११ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९९

                          विवेकानंद अमृत ९९ 

     स्वेच्छेने परधर्मात गेलेले जर परत स्वधर्मात येऊ इच्छित असतील तर त्यांना शुद्ध करावे हे ठीकच आहे . पण काश्मीर आणि नेपाळमध्ये झाले तसे परक्यांच्या स्वाऱ्यामध्ये अत्याचारांमुळे ज्यांना धर्म बदलावा लागला असे जे मुळचे हिंदू आहेत त्यांना; वा जे रक्तानेच परधर्मीय आहेत त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करताना कोणतेही प्रायश्चित्त असू नये . 

शुक्रवार, १० मे, २०१३

विवेकानंद अमृत ९८

                      विवेकानंद अमृत ९८ 

     तुम्ही आपल्या धर्माला आईइतकेच मानत असाल, तर कोणीही हिंदू बांधवाने खिश्चन धर्म स्वीकारला तर ते पाहून तुम्हाला मरणप्राय दुखः व्हायला हवे . हे तर प्रतिदिनी घडत असताना तुम्ही पाहत आहात आणि त्याचे काहीच सोयरसुतक तुम्हाला नाही ? कुठे गेली तुमची श्रद्धा ? कुठे गेली तुमची देशभक्ती ? रोज ख्रिस्ती पाद्री तुमच्या तोंडावर तुमच्या धर्माची  करतात . पण तुमच्या कोणाचेच रक्त तापत कसे नाही ? तुम्ही हिंदूधर्माच्या रक्षणासाठी उभे का राहत नाही ?   

विवेकानंद अमृत ९७

                           विवेकानंद अमृत ९७ 

     पाश्चिमात्य आणि आर्य स्त्रियांचे जीवनादर्श अगदी भिन्न टोकांचे आहेत . पाश्च्यात्यांकडे स्त्री ही  अध्यात्ममार्गावर असलेल्यांना धोकादायक अशी गोष्ट मानली जाते . स्त्रीला कोणतेही धार्मिक संस्कार करण्याचा, अगदी पशुबळी देण्याचासुद्धा अधिकार नाही . उलट आर्यांमध्ये स्त्री ही ' सह्धर्मचारिणी ' आहे . तिच्याशिवाय धार्मिक संस्कार होऊच शकत नाही .  

गुरुवार, ९ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९६

                          विवेकानंद अमृत ९६  

     युरोपियनांच्या प्रभावामुळे आपण जे सारखे म्हणत असतो की , हिंदुस्थानात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते ते काही सर्वस्वी  खरे नाही . सततच्या आक्रमणामुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आपल्याला भाग पडले . आणि आपल्या बहुतेक चालीरीतींचे मूळ ' स्त्रियांना जपले पाहिजे ' या भावनेतच आहे . 

विवेकानंद अमृत ९५

                        विवेकानंद अमृत ९५ 

     स्त्रियांना  स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी समर्थ करणे हा शिक्षणाचा हेतू आहे . यावेगळे त्यांच्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही . इतर कोणत्याही देशातल्या स्त्रियांइतक्याच भारतीय स्त्रियाही आपले प्रश्न सोडविण्यास समर्थ आहेत . 

मंगळवार, ७ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९४

                         विवेकानंद अमृत ९४ 

     भगवान बुद्ध खरोखर श्रेष्ठ पुरुष होते . अत्यंत प्रभावी संघटक होते . संघटनेच्या बळावर त्यांनी आपला संदेश जगभर पोहोचविला . त्यांचा संप्रदाय हा संन्यस्तांचा संप्रदाय होता . त्यांच्यामुळे संन्याशाच्या भगव्या वस्त्रांना महान सन्मान प्राप्त झाला . 

विवेकानंद अमृत ९३

                        विवेकानंद अमृत ९३ 

     मी व्याख्या वगैरे काही करीत नाही . पण शिक्षण म्हणजे व्यक्तींच्या क्षमतांचे विकसन असे म्हणता येईल . मोठे शब्दजाल डोक्यात भरणे म्हणजे शिक्षण नव्हे . प्रेरणा निर्माण करणे, योग्य त्या दिशेने, कार्यक्षमतेने काम करता येईल असे मनोबल व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण करणे म्हणजे शिक्षण असे मला वाटते . 

रविवार, ५ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९२

                         विवेकानंद अमृत ९२ 

     जे इथल्या पुरुषांना सांगायचे तेच स्त्रियांनाही . हिंदुस्थान आणि हिंदू धर्म याविषयी श्रद्धा बाळगा . सामर्थ्याची उपासना करा . आकांक्षी आणि निर्भय बना . लक्षात ठेवा की , जगाकडून हिंदुस्थानला अवश्यमेव काही थोडे घ्यावयाचे आहे . पण त्याच्या अनंतपटीने द्यावयाचे आहे . 

शनिवार, ४ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९१

                          विवेकानंद अमृत ९१ 

     आमच्या कडील स्त्रिया काही फार शिकलेल्या नाहीत . पण त्यांचे आचरण अत्यंत पवित्र असते . प्रत्येक स्त्रीला पतीखेरीज बाकी सर्व पुरुष पुत्रासमान वाटले पाहिजेत . आणि प्रत्येक पुरुषाला धर्मपत्नी सोडून बाकी सर्व स्त्रिया मातेसमान वाटल्या पाहिजेत .  
 

शुक्रवार, ३ मे, २०१३

विवेकानंद अमृत ९०

                              विवेकानंद अमृत ९०

     आमच्याकडे प्राचीन काळापासून ऋषी , मुनी , महात्मे जन्म घेते झाले . त्यांना प्रारंभापासूनच माहीत होते की ,  संसार हे मृगजळ आहे . लौकिक उपभोगासाठी तुम्ही कितीही आटापिटा करा ; शेवटी आत्म्याच्या शांतीतच खरे सुख आहे ! मोठे शरीरबळ असले म्हणजे माणूस सुखी असतो असे नाही . मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवण्यात खरे सुख आहे . येथील ज्ञाते आत्मदर्शनासाठी वानप्रस्थ स्वीकारते झाले . 

गुरुवार, २ मे, २०१३

विवेकानंद अमृत ८९

                            विवेकानंद अमृत ८९ 

     येथील पवित्र भूमीत यज्ञकुंड रचिले गेले . भारताच्या घननीळ आकाशात पवित्र यज्ञधूमाच्या लहरी विस्तारत गेल्या . त्या शांत वायुमंडळात वेदमंत्र निनादले . कुरणावर गुरे-वासरे निर्भरपणे चरली . ज्ञान आणि धर्म यांच्या चरणाशी शस्त्र विनीत होते ! मनुष्य आणि प्राणिमात्र यांच्या जीविताचे रक्षण करणे एवढेच शस्त्रांचे काम होते . दीनांचा संकटकाळीचा कैवारी तो क्षत्रिय मानला जाई . नांगर आणि तलवार यांच्यावर स्वामित्व होते धर्माचे  ! धर्म हा सम्राटांचा सम्राट होता ! धर्माच्या कल्पच्छायेखाली सारे स्वतंत्र निर्भय होते . 

बुधवार, १ मे, २०१३

विवेकानंद अमृत ८८

                           विवेकानंद अमृत ८८ 

     जे तथाकथित युरोपियन पंडित आहेत ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले . त्यांनी येथील एतद्देशियांकडून  भूमी बळकावली . त्यांना नामशेष  केले . या साऱ्या तद्दन खोट्या गोष्टी आहेत . मूर्खांच्या वल्गना आहेत .