११ अखंड भारत
१
मातृभूमीवरील उत्कट, सक्रिय निरपवाद आणि ज्वलंत निष्ठा हा स्वतंत्र विकासोन्मुख व गौरवसंपन्न राष्ट्रजीवनाचा प्राण आहे . आपण हिंदू तर मातृभूमीवरील अत्यंत उदात्त व दैवी प्रेमाचे वारस आहोत . प्रत्येक हिंदुच्या अतःकरणातील तो प्राचीन परंतु आज सुप्त असलेला स्फुल्लिंग प्रज्वलित होऊ दे . त्या सर्व ज्वाला एकत्र होऊन एक प्रचंड यज्ञकुंड रसरसू दे . मातृभूमीवर आजवर झालेली सर्व आक्रमणे, तिचे झालेले अपमान त्या यज्ञीय ज्वालेत जळून खाक होतील आणि भारतमातेला तिच्या मूळच्या अखंड स्वरुपात सुप्रतिष्ठित करण्याचे आपले स्वप्न साकार झालेले दिसेल . - श्रीगुरुजी
२
आज आपल्याला प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात अशी अनुभूती निर्माण करावयाची आहे कि,
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भिन्न भिन्न विचारप्रवाह , संप्रदाय, पंथोपपंथ, जाती उपजाती आणि विविध भाषाभाषी असे आपण सर्व मिळून हा एक अखंड समाज आहे, आपले हे अखंड राष्ट्र आहे व आपले सर्वांचे मिळून एकरस राष्ट्रजीवन आहे .
३
कोणत्या पापाचे फळ म्हणून देशाचे तुकडे पाडण्याची ही शिक्षा आपणाला मिळाली आहे ? आपल्या राष्ट्रजीवनाला न ओळखता मातृभूमीऐवजी दुसऱ्या कशाची पूजा करण्याच्या महापापांचे हे फळ आहे. आपण आपली संस्कृती आणि आपल्या जीवनाचा आत्मा असलेली भारतीयता ठोकरून लावली त्यातून हे विषारी फळ आपल्याला मिळाले. इतिहासामधील घटनांवरून समाजजीवनाची परीक्षा होते. आपल्या सामाजिक चैतन्याचा सतत तेजोभंग केल्यामुळे आपल्याला हा दुर्दैवी दिवस पहावा लागला. आजची ही स्थिती आपल्या विजयाची नसून पराजयाची आहे.
४
भारताचे भाग्य धोक्यात येईल व धुळीसही मिळेल हे अशुभ घडता कामा नये. भारताची फाळणी नाहीशी केली पाहिजे. आपण अशी आशा करूया की, भारताची फाळणी नैसर्गिकरीत्या नाहीशी होईल. केवळ शांतता व समन्वयच नव्हे तर समान कृतीची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर जाणवून एकत्र व एकच काम करण्याच्या सरावाने व त्यासाठी उत्पन्न करण्यात येणाऱ्या साधनाने ही फाळणी दूर होईल.
-योगी अरविंद
५
भारताचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला गेला ती एक महाभयंकर चुकीची व महाभयंकर परिणाम करणारी गोष्ट होती हे अगदी निर्विवादच. हे विभाजन राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक, भावनिक आणि सामाजिक अशा सर्वच दृष्ट्या चूक होते. विभाजनामुळेच देशाचे विभिन्न तुकडे होऊन जे वेगवेगळे देश निर्माण झाले, त्यांचे भवितव्य एकमेकांवर अवलंबून आहे. आजच्या खंडित भारतास आणि त्यांच्या झालेल्या तुकड्यांना शक्तिशाली करावयाचे असेल तर हे विभाजनच समाप्त करावे लागेल. आणि असेच होणारही आहे कारण विभाजन करणे हे निसर्गाच्या विरुद्धच आहे.
- पू. बाळासाहेब देवरस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा