मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२५

                         विवेकानंद अमृत ३२५

     हिंदुस्थानातील सामाजिक नियमांमध्ये कालानुरूप मोठे बदल झाले आहेत . मूलतः हे नियम ही एका मोठ्या रचनेची बीजे या स्वरुपात होते . ही रचना कालपटावर हळूहळू उलगडणार होती . प्राचीन भारतीय ऋषींची दृष्टी इतके दूरचे पाहत असे की, त्यांच्या द्रष्टेपणाचे गुणग्रहण करता येण्यासाठी जगाला अजून अनेक शतके लागतील .  

विवेकानंद अमृत ३२४

                        विवेकानंद अमृत ३२४

     हिंदुस्थानची अवनती झाली याचे कारण पूर्वजांनी घालून दिलेले नीतिनियम वाईट होते हे नसून त्या नियमांची परिणामकारकता सिद्ध होण्याइतका अवधी मिळू शकला नाही हे होय . 

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२३

                        विवेकानंद अमृत ३२३

     गहन आणि विशाल सरितापात्रे, त्यातून दुथडी भरून अवखळपणे वाहणारे पाणी, नंदनवनाला लाजवतील अशी नद्यांच्या काठांवरची सुरम्य उद्याने, त्या उद्यानांमधले सुंदर संगमरवरी प्रासाद, त्यांच्यावर कोरलेल्या अत्यंत देखण्या कलाकृती ही हिंदुस्थानच्या चित्राची एक बाजू . 

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२२

                         विवेकानंद अमृत ३२२

     प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्राणतत्व असते . बाह्यतः दिसणारा माणूस हा त्या तत्वाची एक अभिव्यक्ती असते . जणू त्याच्या रूपाने, त्याच्या भाषेतून ते अमूर्त तत्व व्यक्त होऊ पाहत असते . तसेच प्रत्येक राष्ट्राला सुद्धा एक प्राणभूत राष्ट्रीय तत्व असते . ज्या दिवशी त्या प्राणभूत तत्वाची जगाला असलेली आवश्यकता संपेल त्याचवेळी त्या राष्ट्राचे अस्तित्वही संपेल . अंतर्बाह्य दुःखदारिद्र्य, अत्याचार यांनी पिडलेले असूनही हिंदुस्थान अजून जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे याचे कारणच हे की, त्याच्या प्राणभूत तत्वाची जगाला अद्याप आवश्यकता आहे . 

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२१

                       विवेकानंद अमृत ३२१

     जागतिक संस्कृतीला हिंदुस्थानचे अद्याप काही योगदान करायचे बाकी आहे, म्हणूनच हिंदुस्थान जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे हे आपण समजून घ्या . 

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२०

                        विवेकानंद अमृत ३२०

     अमुक एक सद्गुण ही काही कोण्या एका राष्ट्राची मक्तेदारी होऊ शकत नाही . तरीही व्यक्तींच्याबाबत जसे असते तसे राष्ट्रांच्याहीबाबत असते . म्हणजे काही राष्ट्रांमध्ये, काही विशिष्ट गुणांचा विशेष परिपोष झालेला आपल्याला आढळून येतो .  

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१९

                       विवेकानंद अमृत ३१९

     हिंदूंचे सर्वप्रथम ध्येय आहे मुक्ती . पाश्चात्यांचे सर्वप्रथम ध्येय आहे धर्म . आपण मुक्तीची कांक्षा धरतो ; ते धर्माची धरतात . मीमांसक ज्या अर्थाने धर्म हा शब्द वापरतात त्या अर्थाने मी तो वापरीत आहे . ज्यामुळे इह आणि परलोकात माणूस सुखाची इच्छा बाळगतो तो धर्म . धर्म हा कर्मावर आधारित आहे . धर्म हा माणसाला सुखाच्या पाठीमागे धावायला लावत असतो आणि आनंदप्राप्तीसाठी काम करायला लावत असतो . 

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१८

                           विवेकानंद अमृत ३१८

     सुख कोणत्याही जगातले असो : ते केव्हातरी संपतेच . ते काही शाश्वत सुख नाही . म्हणून मनुष्याने मुक्त होण्याची आकांक्षा धरली पाहिजे, शरिराची गुलामी झुगारून दिली पाहिजे . हा मोक्षमार्ग तुम्हाला फक्त हिंदुस्थानातच सापडेल, अन्यत्र नाही .  

सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१७

                        विवेकानंद अमृत ३१७

     अहिंसा योग्यच आहे . दुष्टतेचा प्रतिरोध करू नये हे एक महान सत्य आहे . पण हिंदू शास्त्रे म्हणतात, " तू गृहस्थ आहेस. कुणीतरी तुझ्या थोबाडीत ठेऊन दिली आणि त्याचा तू प्रतिकार केलास नाहीस, जेवढ्यास तेवढा बदल घेतला नाहीस तर तू खरोखर पापी माणूस आहेस ."  

रविवार, १५ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१६

                      विवेकानंद अमृत ३१६

     गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळवली पाहिजे . आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम पोषण केले पाहिजे . त्यांच्या सुखसोयीकडे लक्ष दिले पाहिजे . शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत . एवढेही तुम्ही करू शकला नाहीत तर मग स्वतःला माणूस कसले म्हणविता ? तुम्ही साधे गृहस्थधर्मी सुद्धा नाही; मग मोक्षाच्या पोकळ गोष्टी कशासाठी ?  

विवेकानंद अमृत ३१५

                         विवेकानंद अमृत ३१५

     माझ्या धर्मबांधवांनो, माझे तुम्हाला हेच सांगणे आहे . अन्याय करू नका . कोणाला अकारण दुखवू नका . इतरांचे जेवढे भले करता येईल तेवढे करा . पण दुसरे कोणी अत्याचार करत असतील तर ते मुकाट्याने सहन करणे हे गृहस्थधर्माच्या दृष्टीने मोठे पाप होय .  

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१४

                         विवेकानंद अमृत ३१४

     वीरपुरुष पृथ्वीतलावरची सुखे भोगतात . तुमचे पौरुष दाखवा; साम, दाम, दंड आणि भेद तसेच खुले युद्ध या सर्वांचा उपयोग करून तुमच्या विरोधकांवर मात करा, विजयी व्हा आणि या जगातील सुखांचा आस्वाद घ्या तरच तुम्ही धार्मिक आहांत . अपमान मुकाट्याने गिळून,लोकांच्या लाथा खात जगणे हे शरमेचे जिणे होय, तो साक्षात नरक होय असे शास्त्रांचे म्हणणे आहे . स्वधर्म हे सत्यांचे सत्य आहे .   

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१३

                      विवेकानंद अमृत ३१३

     सात्विक मनुष्य शांत असतो, काही करताना दिसत नाही हे खरे . पण ते नैष्कर्म्य हे महान शक्तींच्या केंद्रीकरणाचा परिणाम असते . ती शांती प्रचंड शक्तीची जन्मदात्री असते. सात्विक व्यक्तीला आपल्यासारखी हातापायांनी कामे करावी लागतच नाहीत . केवळ त्यांच्या संकल्पाने त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातात . 

बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१२

                      विवेकानंद अमृत ३१२

     सत्वाचा ज्याच्यात परिपोष झाला आहे तो ब्राह्मण . त्याची सर्वत्र पूजा होते . त्याला काय दारोदार ' माझी पूजा करा ' असे सांगत फिरावे लागते ? सर्वशक्तिमयी जगन्माता तिच्या स्वतःच्या हाताने त्याच्या मस्तकावर सुवर्णाक्षरांनी लिहिते : ' या माझ्या सुपुत्राची, या महान आत्म्याची पूजा करा . ' आणि सारे जग ते वाचते, ऐकते आणि त्या महात्म्यापुढे लीनपणे नतमस्तक होते .  

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३११

                            विवेकानंद अमृत ३११

     लक्षात ठेवा बायकी आवाजात, भीत-भीत, अनुनासिक स्वरात, जणू सात दिवस पोटात अन्न नाही अशा मंद्पणाने तुमच्याशी कोणी बोलत असेल; ओल्या भिजल्या, फाटक्या गोधडीसारखा त्याचा अवतार असेल आणि कुणी लाथ दिली तर " का रे " म्हणण्याची सुद्धा हिम्मत नाही असे कुणी तुम्हाला भेटेल तर ती व्यक्ती तमोगुणी आहे असे खुशाल समजा . ही सत्वाची, उन्नतीची लक्षणे नव्हेत तर तमाची, अधःपाताची, मृत्यूची लक्षणे आहेत . 

विवेकानंद अमृत ३१०

                         विवेकानंद अमृत ३१०

गेली सहस्र वर्षे हा देश कृष्ण भगवानांच्या प्रार्थनांनी दुमदुमत आहे . पण भगवंत प्रार्थना ऐकायला तयारच नाहीत . का ऐकावे त्यांनी तुमचे ? मूर्खांचे गाऱ्हाणे जर माणसे सुद्धा ऐकत नाहीत तर मग परमेश्वराने तरी ते का ऐकावे? आता एकाच मार्ग आहे: भगवंताचे गीतेतील शब्द ध्यानी घेणे 


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ न एतद् त्वय्युपपद्यते | 

पार्था दौर्बल्य टाकून दे . 


तस्मात्वमुत्तिष्ठ यशोलभस्व | 

 म्हणून उठ आणि यश, कीर्ती संपादन कर .  

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०९

                        विवेकानंद अमृत ३०९

     केवढा दैवदुर्विलास पहा ! येशु ख्रिस्त-युरोपियनांचे दैवत-त्याची शिकवण अशी की कुणाशी शत्रुत्व करू नका . जे तुमच्याशी शत्रुत्व करतात त्यांचेही शुभ चिंतावे . तुमच्या उजव्या गालावर कोणी थप्पड मारली तर डावा गाल पुढे करावा . सर्व कार्ये थांबवून परलोकाची वाट पहावी, कारण जगाचा शेवट आता जवळ आला आहे .  
     आणि गीतेत श्रीकृष्णानी सांगितले आहे की, खूप उत्साहाने काम करा, तुमच्या शत्रूचा निःपात करा आणि भूमितलावरील संपदा सुखाने भोगा .      पण शेवटी घडले काय ? ख्रिस्ताला जे अभिप्रेत होते त्याच्या, नि कृष्णाला जे अभिप्रेत होते त्याच्या नेमके उलटे घडले . 

रविवार, ८ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०८

                          विवेकानंद अमृत ३०८

     केवळ वैदिक धर्मानेच चार पुरुषार्थांची मांडणी केली . धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांच्या आधारे सामाजिक नीतीनियमांची रचना केली . बुद्ध आपल्या विनाशाला कारणीभूत झाला आणि ख्रिस्त ग्रीस तसेच रोमच्या विनाशाला कारणीभूत झाला . नंतर यथावकाश सुदैवाने युरोपीय हे प्रोटेस्टंट  बनले . पोपच्या माध्यमाने त्यांच्यावर लादली गेलेली ख्रिस्ताची शिकवणूक त्यांनी झुगारून दिली आणि सुटकेचा निःश्वास सोडला .  

शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०७

                      विवेकानंद अमृत ३०७

     प्रत्येक राष्ट्राला काही नियतिनियोजित कार्य असते . जगाला देण्यासारखा काही एक संदेश असतो, जीवितहेतू असतो . म्हणून सर्वांत प्रथम आपण आपल्या वंशाचे जीवितकार्य काय, त्याला नियतीने कोणते काम योजून दिले आहे, राष्ट्रांच्या मांदियाळीत त्याचे स्थान काय, भिन्न भन्न वंशाच्या ऐक्यासाठी तो काय योगदान करू शकेल हे समजून घेतले पाहिजे . 

विवेकानंद अमृत ३०६

                      विवेकानंद अमृत ३०६

     आपल्या पूर्वजांची लाज न बाळगणे हे मी माझ्या आयुष्यातले एक महत्वाचे तत्व समजत आलो आहे . मी स्वाभिमान्यामधला स्वाभिमानी माणूस आहे . पण हे मी स्पष्टच सांगतो की, हा स्वाभिमान स्वतःच्या कर्तृत्वाचा नसून पूर्वजांकडून जे धन मिळाले आहे त्याचा आहे . मी जेवढा  वळून पाहतो, इतिहासाचा जेवढा अभ्यास करतो तेवढा माझा स्वाभिमान प्रदीप्त होतो . या स्वभिमानानेच मला सामर्थ्य, निष्ठा आणि धैर्य दिले आहे . धुळीतून उचलून उभे केले आहे . आणि पूर्वजांच्या वंशचैतन्याने योजलेल्या कार्याला प्रवृत्त केले आहे .  

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०५

                         विवेकानंद अमृत ३०५

     पुरातन आर्यांच्या सुपुत्रांनो ! पूर्वजांच्या रक्तांतून वहात आलेली ती निष्ठा तुमच्यातही संक्रमित होवो, तुमच्या जीवनाचा अविभाज्य अंश होवो आणि उभ्या जगाच्या मुक्ततेला ती कारणीभूत ठरो . 

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०४

                      विवेकानंद अमृत ३०४

     प्रत्येक व्यक्तीला जसे काही व्यक्तिमत्व असते, तसे प्रत्येक राष्ट्रालाही त्याचे व्यक्तिमत्व असते . एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळी ओळखू येते ती तिच्या काही वैशिष्ट्यांमुळे . त्याचप्रमाणे एक वंश इतर वंशांपेक्षा वेगळा ओळखू येतो . प्रत्येक व्यक्तीचे काही जीवितकार्य असते, ते निसर्गनियमांनी सिद्ध झालेले असते . त्याच्या भूतकालीन कर्मांनी त्याच्या पुढच्या जीवनाची एक रेषा ठरवून दिलेली असते . तसेच राष्ट्रांबाबतही असते . प्रत्येक राष्ट्राचे त्याच्यासाठी नियतीने योजलेले असे काही कार्य असते . जगाला देण्याकरिता त्याचा काही संदेश असतो . प्रत्येक राष्ट्राचा काही जीवनहेतू असतो . 


सोमवार, २ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०३

                          विवेकानंद अमृत ३०३

     म्हणूनच अगदी प्रारंभीच आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या वंशाला त्याचे काही जीवितकार्य आहे ., काही जीवनहेतू आहे . राष्ट्रांच्या मांदियाळीत त्याचे म्हणून एक खास स्थान आहे आणि वांशिक एकतेबाबत त्याला करता येण्यासारखे काही विशेष योगदान आहे . 

रविवार, १ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०२

                       विवेकानंद अमृत ३०२

     एखाद्या राष्ट्राच्या जीवनहेतूला ज्यांच्या अभावामुळे धक्का पोचत नाही असे कोणतेही हक्क तुम्ही त्या राष्ट्राकडून काढून घ्या, किंबहुना असे सगळेच हक्क काढून घ्या, ते राष्ट्र तक्रार करणार नाही . पण त्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व ज्यांत साठविलेले आहे अशा गोष्टींवर तुम्ही छोटासा जरी आघात केलात तरी ते राष्ट्र प्रचंड सामर्थ्यानिशी प्रतिकारार्थ सिद्ध होईल . 

विवेकानंद अमृत ३०१

                     विवेकानंद अमृत ३०१

     हिंदूंचे म्हणणे असे असते की, राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य या चांगल्या गोष्टी आहेत हे खरे; पण आत्मिक स्वातंत्र्य, मुक्ती ही सर्वांत सत्य गोष्ट आहे . हाच आमचा जीवनहेतू . याबाबत वैदिक, जैन, बौद्ध, अद्वैती, विशिष्ट अद्वैती किंवा द्वैती कुणीही घ्या . सर्वांचे अगदी एकमत असेल .