शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३००

                         विवेकानंद अमृत ३००

     तुम्हाला मग काय वाटेल ते करा . त्याचे हिंदूला फारसे सोयरसुतक नसते . तो शांत राहतो . पण धर्माच्या बाबतीत त्याला छळून पहा, तुमचा नाश ओढवलाच म्हणून समजा . त्याचे सर्वस्व लुटून घ्या, त्याला लाथा घाला, शिव्या द्या, त्याला फारसे काही वाटायचे नाही . पण त्याचा धर्म मात्र दुखवू नका .   

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९९

                       विवेकानंद अमृत २९९

     आधुनिक काळात हिंदुस्थानावर पठाण घराण्यांनी स्वाऱ्या केल्या . कित्येक घराणी आली आणि गेली . पण कोणाचाच हिंदुस्थानच्या साम्र्याज्यावर जम बसू शकला नाही . कारण ते सर्व हिंदू धर्मावर हल्ले चढवत होते . त्या मानाने मोगलांनी हिंदूंच्या धर्माला फारसा धक्का लावला नाही . आणि म्हणूनच मोगल घराण्यांनी जास्त दृढपणे सत्ता चालविली . एवढेच नव्हे तर त्यांच्या साम्राज्याचा आधार हिंदूच होते .  

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९८

                        विवेकानंद अमृत २९८

     आपले चैतन्य, आपले सामर्थ्य, नव्हे आपले राष्ट्रीय जीवनच आपला धर्म आहे . हे योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, भविष्यकाळाचा विचार करता लाभाचे की बिनलाभाचे, ह्याची मला चर्चा करायची नाही . हे चांगले असो व वाईट असो; आहे हे असे आहे, त्यातून आपली सुटका नाही . हे आज असे आहे, ते भविष्यकाळातही तसेच राहणार आहे . तुम्हाला ते मान्य करावेच लागेल . माझी धर्मावर जेवढी श्रद्धा आहे तेवढी तुमची नसली तरी ! नियतीच्या योजनेने तुम्ही बांधलेले आहात . यातून स्वतःला सोडवून घेऊ पहाल तर शतशः खंडित व्हाल . आपल्या वंशाचे हेच जीवन आहे, त्याचाच आपण परिपोष केला पाहिजे .   


मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९७

                        विवेकानंद अमृत २९७

     आपण आपल्या राष्ट्रीय चैतन्याचे प्राणपणाने जतन केले . त्यासाठी सर्वस्व समर्पण केले . म्हणूनच शतकानुशतके होत आलेले आघात आपण सोसू शकलो . आपल्या पूर्वजांनी त्यासाठी सारे काही सोसले . अगदी म्रुत्युसहि कवटाळले . आपले धर्मचैतन्य सांभाळले . परकीय आक्रमकांच्या बेबंद लाटेखाली मंदिरांमागून मंदिरे कोसळत होती . पण ती लाट परतून जाताच त्याच मंदिरांचे कलश पुन्हा एकदा उन्नत मस्तकाने उभे राहिले . 

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९६

                       विवेकानंद अमृत २९६

     दक्षिण हिंदुस्थानातील काही मंदिरे आणि गुजरातेतील सोमनाथाचे मंदिर आपल्याला खूपच काही शिकवून जातात . पुस्तकाच्या राशी वाचून हिंदू वंशाच्या इतिहासाबाबत जी समज येणार नाही, ती केवळ सोम्नाथाकडे पहिल्याने येईल . शतावधी प्रहारांच्या आणि शतावधी पुनर्निर्माणाच्या कहाण्या या मंदिरावर आपल्याला वाचता येतील . ही मंदिरे पुनः पुन्हा भग्न होत होती आणि पुनः पुन्हा राखेतून उभी राहात होती - नव्या चैतन्याने, नव्या सामर्थ्याने . हाच आपला राष्ट्रीय स्वभाव आहे . हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे . त्याचे अनुगामी व्हा . तो तुम्हाला वैभवाप्रत नेईल . त्याचा पाठपुरावा सोडून द्या - लगेच तुमचा मृत्यू , तुमचा विनाश ठरलेलाच आहे . 

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९५

                    विवेकानंद अमृत २९५

     मला असे म्हणायचे नाही की, बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत . राजकीय आणि सामाजिक सुधारणा आवश्यक आहेतच . पण त्या दुय्यम आहेत . येथे सदैव धर्मालाच प्राधान्याचे स्थान आहे .  

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९४

                       विवेकानंद अमृत २९४

     या राष्ट्राचा आत्मा त्याच्या धर्मातच आहे . आजवर कोणीही या आत्म्याला धक्का पोचवू शकलेले नाही . म्हणून अनंत प्रहार आणि आक्रमणे सोसूनही हिंदू राष्ट्र अजून चैतन्यपूर्ण आहे .  

विवेकानंद अमृत २९३

                         विवेकानंद अमृत २९३

     भिन्न भिन्न रूपे असली तरी अग्नी जसा एकच असतो तसे ते विराट चैतन्य एकच आहे . मग ते फ्रेंचांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या रूपाने व्यक्त होवो, इंग्रजांच्या व्यापारी बुद्धीतून आणि समान लाभाच्या तत्त्वातून व्यक्त होवो किंवा हिंदूंच्या मुक्ती आणि आत्मिक स्वातंत्र्याच्या आकांक्षेतून व्यक्त होवो . 

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९२

                            विवेकानंद अमृत २९२

     मी आपल्याला अत्यंत गांभीर्याने असे विचारू इच्छितो की, सहस्रो वर्षांच्या परंपरेतून विकसित झालेले आपले राष्ट्रीय चारित्र्य सोडणे सोपे की, केवळ काही शतकांचा, आपल्यावर कलम केला गेलेला कोणता तरी परकीय संस्कार सोडणे सोपे ?  

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९१

                       विवेकानंद अमृत २९१

     पर्वतश्रेष्ठाच्या कुशीतून निघून सहस्रो मैलांचा प्रवास करीत एक महान सरिताप्रवाह भूतलावर आला आहे . तो आता आपल्या मूलस्थानी जाऊ शकेल का ? आत्तापर्यंत क्रमलेली वाट पुन्हा उलटी शोधत जायचे म्हटले तर तो प्रवाह खंडित होईल, सुकून जाईल . महानदीने केव्हा-ना-केव्हा सागरालाच जाऊन मिळायला हवे . 

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९०

                      विवेकानंद अमृत २९०

     दहा सहस्र वर्षांचा आपला राष्ट्रीय जीवनाचा प्रवास जर चुकीचाच आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला आता इलाज नाही . आता नवीन राष्ट्रीय स्वभाव घडवायला बसले तर त्याचा परिणाम विनाशातच होईल .  

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८९

                    विवेकानंद अमृत २८९

     मला क्षमा करा, पण आपले राष्ट्रीय साध्य चूक आहे असे म्हणणे हे केवळ अज्ञानाचे लक्षण आहे . प्रथम दुसऱ्या देशामध्ये जा, त्यांची संस्कृती स्वतःच्या डोळ्यांनी पहा . इतरांच्या दृष्टीकोनातून नको . तुम्हाला जर विचारशक्ती असेल तर त्यावर सखोल विचार करा . मग तुम्ही आपले स्वतःचे धर्मग्रंथ वाचा, आपले प्राचीन साहित्य वाचा, सर्व हिंदुस्थानभर प्रवास करा . सुबुद्ध आणि तीक्ष्ण दृष्टीच्या अभ्यासकाप्रमाणे या देशाच्या विविध भागांचा, येथील चालीरीती, रीतीरिवाज यांचा अभ्यास करा . म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ दिसून येईल की, हे राष्ट्र अद्यापी चैतन्यपूर्ण आहे . याच्या लोकजीवनात अजूनही तेच ते सनातन स्फुरण भरून राहिलेले आहे . 


रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८८

                      विवेकानंद अमृत २८८

     विनाश आणि मृत्यू यांच्या राखेत आजही आपल्या राष्ट्रीय जीवनाचे निखारे धगधगत आहेत . या देशाचे जीवन म्हणजे धर्म . याला धर्माचीच भाषा उमगते . धर्म हेच याचे प्राणतत्व .  

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८७

                         विवेकानंद अमृत २८७

     प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण  कार्यपद्धती असते . काही राजकारणाच्या माध्यमातून काम करतात, काही सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून, तर काही अन्य प्रकारे . आपल्याबाबत धर्म हेच केवळ मध्यम आहे . 

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८६

                      विवेकानंद अमृत २८६

     इंग्लिश माणसाला धर्म राजकारणाच्या माध्यमातून कळतो, अमेरिकन माणसाला कदाचित सामाजिक सुधारणामधून धर्म कळेल . पण हिंदूला राजकारण कळेल तेहि धर्माच्या माध्यमातून, समाजशास्त्र आले पाहिजे तेही धर्मातूनच, सर्व काही कळेल ते धर्माच्या माध्यमातूनच . कारण हिंदू राष्ट्रीय जीवनसंगीताचा धर्म हा प्राणस्वर आहे .  

विवेकानंद अमृत २८५

                      विवेकानंद अमृत २८५

     राजकीय स्वामित्व हा एखाद्या देशाचा प्राणस्वर असू शकेल . धर्म आणि अन्य गोष्टी हे त्या स्वराचे संवादी स्वर असतील . पण हा एक देश असा आहे की, अध्यात्म आणि चरम त्याग हेच इथले जीवनस्वर आहेत . या देशाचे सूत्र असे की, दिसणारे-भासणारे जग ही दोन दिवसांची माया आहे . म्हणून आत्मदर्शनापुढे विज्ञान, उपभोग, सत्ता,संपत्ती, नांव, कीर्ती या सर्व गोष्टी दुय्यम आहेत . 

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८४

                       विवेकानंद अमृत २८४

     प्रत्येक हिंदू  मुलात आध्यात्मिकता आणि वांशिक शुद्धता ही जणू जन्मजात असते . हिंदू राष्ट्रीय चारित्र्याचे रहस्य असे की, पाश्चात्य विद्या, सामर्थ्य, सत्ता आणि कीर्ती ही तो आत्मदर्शनापुढे तुच्छ मानतो . 

विवेकानंद अमृत २८३

                       विवेकानंद अमृत २८३

     माझ्या मित्रांनो ! सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपले अध्यात्म, आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले हे अमोल धन हृदयाशी घट्ट धरून ठेवा . असा देश तुम्हाला माहिती आहे का की, जेथील मोठे मोठे सम्राट आपली कुलपरंपरा कोण्या राजाशी नेउन भिडवत नाहीत; अथवा कोण्या दऱ्याखोऱ्यात लपून राहणाऱ्या, वेळी अवेळी लोकांना लुटणाऱ्या पेंढारी सरदारांशी जोडत नाहीत; तर कौपिनधारी, वनात राहणाऱ्या ब्रह्मवेत्त्या ऋषींशी नेउन जोडतात ? हिंदुस्थान हा असा देश आहे . 

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८२

                      विवेकानंद अमृत २८२

     अध्यात्मावर तुमचा विश्वास असो अगर नसो, तुम्हाला राष्ट्रजीवनासाठी अध्यात्माला दृढ धरून राहिलेच पाहिजे . एका हाताने आपले अध्यात्म घट्ट धरून ठेवा आणि दुसऱ्या हाताने अन्य वंशाकडून तुम्हाला जे काही घेणे शक्य आहे ते सर्व घ्या . मात्र आपल्या राष्ट्रीय जीवनध्येयापुढे अन्य सर्व गोष्टी दुय्यम आहेत हे विसरू नका . त्यातूनच हिंदुस्थानचा अपूर्व, भव्यतम भविष्यकाळ दृष्टीपथात येईल . माझी श्रद्धा आहे की तो निकट आहे . यापूर्वी कधीही नव्हते असे हिंदुस्थानचे उज्ज्वल उज्ज्वलतम चित्र मला दृष्टीपुढे दिसत आहे . 

रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८१

                    विवेकानंद अमृत २८१

     हीच प्रार्थना कर : " अहो गौरीपती ! हे जगज्जननी ! मला पुरुषार्थ प्रदान करा . हे शक्तीदेवते ! माझे दौर्बल्य विलयास ने, माझ्यातील भीरुता काढून टाक आणि मला पौरुषसंपन्न कर ! " 

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८०

                      विवेकानंद अमृत २८०

     ऊठ ! बोल : " हिंदुस्थानची धूली हाच माझा स्वर्ग . हिंदुस्थानचे सदभाग्य तेच माझे सदभाग्य ! " अरे भाई, दिवसरात्र याचाच जयजयकार कर . 

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७९

                    विवेकानंद अमृत २७९

     कमरेला केवळ कौपिन असले तरी उच्चरवाने घोषणा कर : " प्रत्येक भारतवासी हा माझा बंधू आहे . भारतीयत्व हेच माझे जीवन, भारताच्या देवदेवता ह्याच माझ्याही देवदेवता . हा विशाल भारतीय समाज म्हणजे माझ्या बालपणीचा हिंदोळा, यौवनाचे नंदनवन, आणि वृद्धावस्थेतील वाराणशी , "

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७८

                        विवेकानंद अमृत २७८

     आपण भारतवासी आहोत याचा अभिमान धर आणि अभिमानाने म्हण : " मी भारतवासी आहे . प्रत्येक भारतवासी माझा भाऊ आहे . अज्ञानी भारतवासी, दरिद्री आणि दलित भारतवासी, ब्राह्मण भारतवासी आणि भंगी भारतवासी हे सारे माझे भाऊ आहेत . " 

विवेकानंद अमृत २७७

                       विवेकानंद अमृत २७७

     विसरू नकोस की, तुझी समाजरचना म्हणजे विश्वशक्तीचे एक स्पंदन आहे . विसरू नकोस की, हे दलित, अजाण, निरक्षर, हा कोळी, तो भंगी हे तुझ्याच हाडामासाचे तुझेच भाऊ आहेत . हे शूर पुरुषा, धैर्यशील हो ! 

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७६

                     विवेकानंद अमृत २७६

     माझ्या भारता ! 
     तुझ्या स्त्रीत्वाचा आदर्श हा सीता, सावित्री, दमयंती यांचा आहे हे विसरु नकोस . ज्या देवाची तू  पूजा करतोस तो देव सर्वसंगपरित्यागी वैराग्यशिरोमणी असा उमापती शंकर आहे . 
     विसरू नकोस की, आपल्याकडे विवाह, संपत्ती, सर्व जीवन ही विषयसुखासाठी नसतात, केवळ व्यक्तिगत उपभोगासाठी नसतात . 
      विसरू नकोस की, जगदंबेच्या चरणापाशी समर्पित होण्यासाठी तुझा जन्म आहे . 

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७५

                      विवेकानंद अमृत २७५

     हे भारता ! केवळ दुसऱ्यांचे सूर ओढून, परक्यांची भ्रष्ट नक्कल करून तिऱ्हाईतांवर अवलंबून राहून तू संस्कृतीच्या आणि श्रेष्ठतेच्या उच्चपदावर आरूढ होऊ शकशील का ? 

विवेकानंद अमृत २७४

                     विवेकानंद अमृत २७४

     योग्य आणि अयोग्य कल्पनांच्या या मंथनातून हिंदुस्थानच्या भविष्यकालाबद्धल काही आशेचे चिन्ह दिसू लागले आहे . हिंदुस्थानातील प्राचीन कल्पना आणि पाश्चात्य देशांकडून नव्याने आलेल्या कल्पना यांचा जो संघर्ष झाला, त्यातून हिंदुस्थानला नव्यानेच जाग येऊ लागली . 

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७३

                      विवेकानंद अमृत २७३

     एका बाजूला शुद्ध भौतिकवाद, प्रचंड सामर्थ्यसत्ता, वैभव, इंद्रियसुखांमागे धावण्याची आस असे सर्व पाश्चात्य साहित्यातील प्रवाह भारतीय तरुणाचे मन खळबळवून टाकतात, तर दुसरीकडे ह्याच्याशी अगदी विसंगत अशी हिंदुस्थानच्या प्राचीन देवदेवतांची आर्त आवाहने त्यांच्या कर्णरंध्रात खोलवर शिरत असतात . 

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७२

                          विवेकानंद अमृत २७२

     व्यक्तीस्वातंत्र्य हे पश्चिमेचे ध्येय आहे . उत्पादक शिक्षण ही त्यांची परिभाषा आहे . राजकारण हे साधन आहे . हिंदुस्थानात मुक्ती हे ध्येय आहे . वेद ही परिभाषा आहे आणि सर्वसंगपरित्याग हे साधन आहे .