गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत २५

                           विवेकानंद अमृत २५ 

     आपण संकटांना , प्रतिकूलतेला निमंत्रण देत असतो . आपले शरीर व्याधीला ग्रासंण्यासारखे झाल्याखेरीज व्याधी शरीरात प्रवेश करीत नाही . अमुक एका प्रकारच्या जंतूंमुळे रोग होतो हे पूर्ण सत्य नाही . आपल्या शरीराची स्थिती अशी झालेली असते की , जंतूंना ठाणे मांडायला अवसर मिळावा . आपली जी योग्यता असते तेच आपल्याला मिळते . सारा अभिमान सोडून आपण हे सत्य स्वीकारुया की , जे दुःख आपल्या वाट्याला येते ते आपणच ओढवून घेतलेले असते . आपल्यावर अमुक एक आघात झाला तो आपला काही एक दोष नसताना झाला हे खरे नाही . ' एकही अनिष्ट गोष्ट अशी नाही , जिच्याकडे मी माझ्या पायाने चालत गेलो नाही . ' हे सदैव स्मरणात ठेवले पाहिजे . 

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत २४

                           विवेकानंद अमृत २४ 

     नीट आत्मपरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की , प्रत्येक दुःख आपल्या कर्मानेच आपल्या वाट्याला येत असते . त्याचे अर्धे श्रेय तुमच्याकडे जाते आणि अर्धे जगाकडे जाते . या विचाराने मनाला सांत्वना मिळेल . या सर्व परीक्षणातून तुमच्या मनात आशेचा एक किरण जागा होईल . ' बाह्य जग तर मी बदलू शकत नाही . पण माझे अंतर्जगत तर माझ्या निकट आहे . त्यावर माझे स्वामित्व आहे . जर माझ्यावर आघात करण्यासाठी बाह्य घटक आणि आंतरिक घटक हे दोन्ही कारणीभूत होतात , तर माझ्या हाती असलेल्या आंतरिक घटकांवर तरी मी नियंत्रण ठेवीन . मी खरोखर स्वतः च्या अंतर्जगताचा स्वामी असेन तर मी स्वतःवर आघात होऊ देणार नाही . ' 

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत २३

                        विवेकानंद अमृत २३ 

     आपल्या भविष्याचे शिल्पकार आपणच व्हा . भूतकाळात जे होऊन गेले त्याचे स्मरणही ठेऊ नका . असीम भविष्यकाळ आपल्यापुढे आहे . लक्षात ठेवा , तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द , केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते . दुष्ट विचार आणि दुष्ट कृती या तुमच्यावर झडप घालायला वाघासारख्या टपलेल्या असतात . तसेच शुभविचार , शुभकृत्ये यांच्या अनंत शक्तीही तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी , साहाय्य करण्यासाठी सदैव सिद्ध असतात . 

विवेकानंद अमृत - २२

                         विवेकानंद अमृत २२

     स्वतःच्या दोषांचे खापर इतरांवर फोडू नका . खंबीरपणे उभे रहा आणि त्यांची जबाबदारी स्वतः स्वीकारा . म्हणा : ' माझे दुःख हे माझ्याच कर्माचे  फळ आहे . त्यामुळे ते मीच पुसून टाकू शकतो . दुसऱ्या कोणी निर्माण केलेले मी पुसून टाकू शकणार नाही . म्हणून ताकदीने उभे रहा . धैर्यवान व्हा . सर्व दायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि जाणून असा की, तुमचे भाग्य घडविणारे तुम्हीच आहात . 

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - २१

                           विवेकानंद अमृत २१


      जो तो आपल्याच कर्माची शुभाशुभ फळे भोगत असतो, हा शाश्वत सिद्धांत आहे . कधी कधी आपल्याला वाटते की असे नसेल. परंतु दूरगामी विचार केला तर या सिद्धांताची सत्यता पटते . एखादा मनुष्य आयुष्यभर संपत्तीच्या मागे लागतो, हजारो लोकांना तो फसवितो मग त्याचेच जीवन त्याला असह्य होऊन बसते . आपण सुखसोयीची अनेक साधने गोळा करतो . एखादा माणूस जगातील सर्व ग्रंथसंपत्ती आपल्या ग्रंथालयात आणील ; पण तो जे वाचील तेवढेच त्याला लाभेल . हि त्याची योग्यता त्याच्या कर्माने ठरत असते . 

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - २०

                        विवेकानंद अमृत - २०

     आपल्याला काय लाभेल, त्यातील आपण काय ग्रहण करू शकू हे सारे आपले कर्मच ठरविते. आपण आज जे आहोत त्याला कारण आपणच आहोत. आणि जे उद्या व्हायची आपल्याला इच्छा आहे तसे स्वतःला घडविण्याचे सामर्थ्यही आपल्यातच आहे. आज आपण जे आहोत ते जर आपल्या पूर्वकर्माचे फळ असेल तर आपण उद्या काय असणार हे आपल्या आजच्या कृतीचे फळ असेल हे ओघानेच आले. म्हणून कर्माचे रहस्य आपल्याला कळले पाहिजे.

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १९


                        विवेकानंद अमृत - १९

     ' आत्मैव हि आत्मनो बन्धुः ' सहाय्य अंतर्यामीच असते. जगातल्या सर्व देवांना जरी तुम्ही सहाय्याची हाक घातलीत तरी ते धावून येणार नाहीत.मी वर्षानुवर्षे असा धावा केला आणि त्याचा उपयोगही झाला.पण सहाय्य लाभले ते आतून. मी ज्या चुकीच्या गोष्टी करीत होतो त्या मलाच निस्तराव्या लागल्या.पण हा एकच मार्ग आहे. मी माझ्याभोवती जे जाळे विणले होते ते माझे मलाच तोडावे लागले.आणि ते तोडण्याची शक्ती मला माझ्याच अंतःकोषातून मिळाली.

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १८


                            विवेकानंद अमृत - १८

     शुभ आणि  अशुभ, सुख आणि दुःख हे माणसाकडे धावून येत असते, त्याच्या अवती भोवती तरळत असते.त्यातून त्याच्या प्रवृत्ती घडतात, चारित्र्य घडते आणि तेच तो बाहेर प्रक्षेपित करीत असतो. यापैकी काहीही आत ओढून घेण्याची शक्ती जशी त्याच्याजवळ आहे तशीच बाहेर प्रक्षेपित करण्याचीही आहे.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १७


                             विवेकानंद अमृत - १७

     मनुष्य जर शुभ विचार करीत असेल, शुभ कृती करीत असेल, तर त्याच्या मनावर संकलित परिणाम शुभ संस्कारांचा असेल आणि ते संस्कार त्याला त्याच्या इच्छेविरुध्दही चांगली कर्मे करण्यास भाग पाडतील. जर मनुष्याने अनेकानेक शुभकर्मे केलेली असतील तर त्याच्यात शुभकर्म प्रवृत्तीच अत्यंत बलवत्तर होते.  

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १६


                        विवेकानंद अमृत - १६

     अत्यंत शांततेत आणि मौनात ज्याची प्रचंड कार्यशक्ती गतिमान असते आणि भोवती प्रचंड कर्म-कोलाहल सुरु असतानाही ज्याच्या अंतर्यामी निगूढ शांती आणि स्थिरता यांचे वास्तव्य असते तो मनुष्य आदर्श समजावा. तो स्वतःचा स्वामी आहे. त्याला संयमाचे रहस्य कळलेले आहे. मोठ्या रस्त्यांवरच्या गजबजलेल्या वाहतुकीतून तो चाललेला असला तरी निःशब्द गुहेत ध्यानस्थ बसल्यासारखे त्याचे मन स्थिर असते. तरीही तो सर्वकाळ अत्यंत कार्यमग्न असतो. हाच कर्मयोगाचा आदर्श आहे.

विवेकानंद अमृत - १५


                          विवेकानंद अमृत - १५

     संतापाची प्रचंड लाट उसळून येते तेव्हा तिच्यावर संयम कसा करावा ?विरुद्ध भावाची एक लाट उत्पन्न करावी.शुभचिंतन करावे.एखादे वेळी पत्नी पतीवर फार संतापलेली असते आणि त्याचवेळी तिचे मूल लडिवाळपणाने जवळ येते तेव्हा क्रोधाची लाट मावळते.तिची जागा प्रेमाची नवी लाट घेते. स्तेयाचा विचार मनात आला की, अस्तेयाचा विचार मुद्दाम करावा. घेण्याची इच्छा झाली की, देण्याची इच्छा करावी.

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १४


                             विवेकानंद अमृत - १४

     श्रेष्ठ महात्मे शांत आणि अज्ञात असतात. त्यांच्याजवळ विचारांची मोठी शक्ती असते. त्यांचा विश्वास असतो कि, ते गुहेत जाऊन दाराला शिळा लावून बसले आणि त्यांनी केवळ पाच सत्य विचारांचे प्रक्षेपण केले तरी ते पाच विचार चिरंतन होतील. ते महापर्वत उल्लंघून, महासागर ओलांडून सर्व जगतात संचारतील. मानवजातीच्या बुद्धीत आणि हृदयात ते सखोल जाऊन पोचतील आणि स्त्री-पुरुषांमध्ये त्या विचारांचे आचरण करण्याची प्रेरणा निर्माण करतील.

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १३


                      विवेकानंद अमृत - १३

     काही थोड्या लोकांनी तरी उठून उभे राहावे आणि म्हणावे की, परमेश्वराखेरीज आम्हाला अन्य ईप्सित नाही. जगासाठी धर्मजागरण करणे हेच आमचे जीवितकार्य. असा त्याग तुम्ही करू शकत असला, तर दृढपणे उभे रहा. हे धर्मयुद्ध आहे. यात शंभर योद्धे जरी कोसळले तर त्यांच्या हातीची ध्वजा घ्या आणि ती पुढे न्या. जो पडतो त्याने आपल्या हातीची ध्वजा दुसऱ्याच्या हाती द्यावी. ती काही कधी खाली येणार नाही. कोणीही पडले तरी ईश्वरी सत्ता अढळ राहणार आहे. 

विवेकानंद अमृत - १२


                       विवेकानंद अमृत - १२

     चरित्र्यसंपन्न, बुद्धीसंपन्न आणि लोकसेवेसाठी सर्वस्व समर्पण करणारे युवक हवेत. माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणही ओवाळून टाकण्याची सिद्धता असलेल्या आणि त्याद्वारे स्वतःचे आणि संपूर्ण देशाचे कल्याण करू शकणाऱ्या आज्ञांकित युवकांवरच माझ्या भविष्यातील आशा केंद्रित झाल्या आहेत. सर्वसामान्य मुले माझ्याकडे येतच असतात. त्यांच्या मुद्रांवर तेज नसते, त्यांच्या हृदयात उत्साहाचा अभाव असतो, त्यांची शरीरे दुर्बळ, कुचकामी असतात आणि मनात धैर्याचा लेशही नसतो. अशांकडून काय काम होणार? नचिकेताची श्रद्धा असलेले बारा युवक मला मिळाले तर या देशातील विचारांना आणि कार्याला मी नवी दिशा देऊ शकेन.

विवेकानंद अमृत - १०


                           विवेकानंद अमृत - १०

     आधुनिक हिंदुनो, या मोहनिद्रेतून जागे व्हा ! ते कसे व्हायचे याचा मार्ग आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आहे. आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घ्या. इतरांना करून द्या. आपल्यातल्या सुप्त आत्मशक्तीला आवाहन करा. मग पहा ती कशी जागृत होऊन उठते ती ! हि सुप्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रुपाने प्रकट झाली म्हणजे प्राप्त होणार नाही असे काय आहे? सामर्थ्य येईल,वैभव येईल,सद्गुण येतील, शुचिता येईल ! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे येईल !

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - ११


                          विवेकानंद अमृत - ११

     सुशिक्षित तरुणांमध्ये कार्य करा, त्यांना एकत्र आणा, त्यांची संघटना करा. श्रेष्ठ त्यागातूनच श्रेष्ठ कार्य उभे राहते.माझ्या शूर, गुणी, मुलांनो ! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वतःची सर्व शक्ती वेचा ! नाव,कीर्ती,किंवा असल्या क्षुद्र गोष्टींच्या मागे लागू नका. झोकून देऊन काम करा. लक्षात ठेवा, ' सुके गवत जेव्हा दोरखंडात गुंतले जाते तेव्हा त्यामध्ये पिसाट हत्तीलासुद्धा बांधून ठेवण्याचे सामर्थ्य येते.

विवेकानंद अमृत - ९


                             विवेकानंद अमृत - ९

     मी भविष्यात डोकावून पहात नाही.तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात उभे राहते. हि प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शान्तिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करूया!

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - ८


                        विवेकानंद अमृत - ८

     हे वीर आत्म्यांनो, ज्यांना बेड्यांनी जखडून टाकले आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी, जे दुःखाच्या भाराने लादले गेले आहेत त्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि जे अज्ञानाच्या घनघोर अंधारात बुडून गेले आहेत अशांची हृदये प्रकाशित करण्यासाठी पुढे चला ! ऐका ! वेदांत डंका पिटून घोषणा करीत आहे ' अभिः ' निर्भय बना . ईश्वराची हि पवित्र वाणी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या हृदयाची तर छेडण्यास समर्थ होईल .

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - ७


विवेकानंद अमृत - ७

     भौतिकवाद, इस्लाम, ईसाईयत वा जगातील अन्य कोणतेही तत्वज्ञान  आम्ही त्यांना थारा दिला नसता तर यशस्वी झाले नसते .जोपर्यंत मनुष्य खराब अन्न, शरीराचे पाप याने दुबळा होत नाही तोपर्यंत कोणताही रोगजंतू त्याचेवर हल्ला करीत नाही .धडधाकट माणसावर विषाक्त रोगजंतूंचा काडीइतका परिणाम होत नाही . अजूनही वेळ गेली नाही, आपण आपले वागणे बदलू या.

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - ६


विवेकानंद अमृत - ६

      नद्या,पर्वत आणि सागर यांना उल्लंघून देश काळाच्या अडथळ्यांना जणु नगण्य ठरवून भारतीय चिंतनाचे रक्त पृथ्वीवर राहणाऱ्या अन्य वंशाच्या धमन्यामध्ये कित्येक ज्ञात, अज्ञात, स्पष्ट, अनिर्वचनीय मार्गांनी आतापर्यंत वाहत आले आहे व आज देखील वाहत आहे .बहुधा,जगाच्या प्राचीन ज्ञानभांडारात आपला सिंहाचा वाटा आहे .

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - ५


                          विवेकानंद अमृत - ५

     प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय विचार असतो . विश्वधारणेसाठी असा विचार असणे आवश्यक असते . ज्या दिवशी विश्वधारणेसाठी हा विचार अनुपयुक्त होईल त्या दिवशी हा विचार  करणारी व्यक्ती असो व राष्ट्र असो ते नष्ट होईल . दुःख, दैन्य, दारिद्र्य व देशांतर्गत, देशाबाहेरून अत्याचार होऊन सुद्धा हा देश जिवंत आहे . कारण या देशाचा राष्ट्रीय विचार  विश्वधारणेसाठी आवश्यक आहे .

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - ४


                            विवेकानंद अमृत - ४

    गरीब , अज्ञानी आणि दलित यांच्या बद्दल सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी सतत कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा वारसा मी तुम्हाला देत आहे . जे गरीब आहेत , जे दलित आहेत ,जे खालच्या जातीचे समजले जातात त्यांच्यासाठी कष्ट  करा . बलिदान करा .आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान करा .बंधुनो ! आपण सर्वजण सतत कार्य करू या ! हि झोप घेण्याची वेळ नाही . भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे . भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे . उठा ! जागे व्हा आणि आपल्या ह्या भारतमातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुनः विराजमान झालेली पहा . तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या . आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल अशा अपूर्व तेजाने ती परत तळपू द्या .

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - ३


                       विवेकानंद अमृत - ३

     भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते .म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा .तुमच्या मागे जो अनंत जीवनप्रवाह आहे त्याचे यथेच्च  प्राशन करा , आणि पुढे पहा .पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा . आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा .आम्ही प्रथम त्या तत्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत . त्या रक्ताला समजले पाहिजे कि जे आमच्या नसानसातून वाहत आहे .आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे . भूतकाळातील ती श्रेष्ठता व चेतना , त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे .

सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - २


विवेकानंद अमृत - २

     वेदांत म्हटले आहे ' अशिष्टो बलिष्टो दृढिष्टो मेधावी ' म्हणजेच ' दृढ बलशाली , तीव्र बुद्धीची आणि चैतन्यशाली माणसेच ईश्वराजवळ पोहोचू शकतात .' तुमचा भविष्यकाळ निश्चीत करण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच मी म्हणतो,आताच या उसळत्या तारुण्यात, या नव्या उत्साहाचे वातावरणातच  कार्य करा . काम करण्याची हीच वेळ आहे .आताच आपल्या भाग्याचा निर्णय करा आणि कामाला लागा .कारण जे पुष्प अजून चुरगळलेले नाही, जे ताजे आहे, जे अद्याप हुगले गेलेले नाही तेच ईश्वरचरणी अर्पण केले जाते .ईश्वर त्याचाच भुकेला असतो .

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

विवेकानंद अमृत - १


विवेकानंद अमृत - १

     आमची हि पवित्र मातृभूमी धर्म व दर्शन यांची भूमी आहे . हि महामानवीय आध्यात्मिक महापुरुषांची जन्मभूमी आहे .अपरिग्रह व संन्यास यांची भूमी आहे .अगदी अतिप्राचीन काळापासून आत्तापर्यंत केवळ येथेच  मनुष्य प्राण्यासमोर उच्चतम आदर्श राहत आला आहे .