शनिवार, २४ जानेवारी, २०१५

५. विजयादशमी

५.  विजयादशमी 
           आपले कार्य श्रेष्ठ आहे,महान आहे, ईश्वरी आहे म्हणून उठा आणि नेटाने कामाला लागा. सत्य आपल्या बाजूला आहे. अन्याय सहन करीत झोपून राहाणे हे पाप होय. त्यासाठी भारतमातेचे ध्यान करून तिच्या प्रेमाने प्रेरित होऊन उठा आणि कार्यविस्तार करा. विजय निश्चित आहे. कारण जेथे धर्म असतो तेथे भगवंत असतात. आणि जेथे भगवंत असतात तेथे विजय असतोच.                                                         -  प. पू . श्रीगुरुजी 

          वास्तविक पाहता सहिष्णुतेप्रमाणेच विजिगिषु वृत्ती ही आवश्यक आहे आणि जर असे म्हटले की विजिगिषु वृत्तीची अधिक आवश्यकता आहे, तर ते खोटे नाही. विजिगिषु भावनेशिवाय कोणताही समाज जिवंत राहू शकत नाही आणि आपला विकासही करु शकत नाही.                                                                                    - दीनदयाळ उपाध्याय 

     आपण आपल्या सेवावृत्तीने, परिश्रमाने समाजात उत्पन्न झालेली अविश्वासाची भावना दूर केली पाहिजे. आपल्या कार्याची पूर्णतः भावात्मक भूमिका सर्वांना समजावून सांगितली पाहिजे. जे आपला विरोध करताना दिसतात त्यापैकी सर्वच एकजात अप्रामाणिक नाहीत. त्यांच्याशी चांगले स्नेहाचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. अखेर विजय आपलाच आहे. कारण सत्य व धर्म आपल्या बाजूला आहे. ' यतो धर्मस्ततो जय: ' हा पक्का विश्वास ठेवा. आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि समाजाविषयीच्या निरपेक्ष प्रेमभावनेतून केलेल्या कार्यामुळे आपण भारताचे भाग्यविधाते ठरणार आहोत. नव्या वैभवशाली भारताची उभारणी करणार आहोत. विरोध व संकटे यांना तोंड देत, त्यासाठी अमर्याद परिश्रम करण्याचा संकल्प या विजयादशमीच्या शुभदिनी करूया. हेच आपले सीमोल्लंघन.

    हिंदुराष्ट्राला सुसंघटित करण्याला डॉक्टरांनी प्रारंभ केला तो त्यांच्या विजयाकांक्षी मनोरचनेशी सुसंवादी अशा सीमोल्लंघनाच्या मुहूर्तावर ! व्यक्तिगत जीवनातून समष्टी जीवनाकडे, दास्यातून स्वातंत्र्याकडे, निद्रेतून जागृतीकडे, दैन्यांतून स्वर्गतुल्य सुखाकडे व दौर्बल्यातून दिग्विजयी तारुण्याकडे साऱ्या हिंदुसमाजाला नेणारे सीमोल्लंघन डॉक्टरांनी या दिवशी सुरू केले. प्रभु रामचंद्रांनी रावणाला रामबाणाचा प्रताप याच दिवशी दाखविला होता आणि महिषासुराचा वध ही दुर्गामातेने याच दिवशी केला होता. दुष्टांना भयकंपित करणारे बलिष्ठ हिंदुराष्ट्र जागृत करण्याला अशा विजयांचे स्मरण करून देणाऱ्या विजयादशमीहून कोणता मुहूर्त अधिक समर्पक ठरला असता ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा