१३५ हिंदु संगठन
१
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य एखाद्या नगरापुरते वा प्रांतापुरते मर्यादित नाही. आपला संपूर्ण हिंदुस्थान देश अतिशीघ्र सुसंगठीत करून स्वसंरक्षणक्षम व बलसंपन्न करण्याच्या उद्देशाने त्याचा आरंभ केलेला आहे. हा समाज असंघटित व विस्कळीत राहिला तर भविष्यात त्याचे अस्तित्व सुद्धा राहणार नाही व हिंदू संस्कृतीचे नावसुद्धा राहणार नाही.
२
हिंदू समाजाचे आजच्या भयानक संकटापासून रक्षण करावयाचे असेल तर एक असे देशव्यापी नैतिक आंदोलन करावे लागेल की ज्यामुळे प्रत्येकाच्या अंतःकरणात आत्मचेतना जागृत होईल. ती जागृत होताच आत्मविश्वासाने स्वतःच्या शक्ती, सामर्थ्य, बल व पराक्रमाच्या आधारावर समाजातील प्रतिक्रियाशील, विरोधी शक्तींचे निर्दालन करून आत्मसन्मान आणि आत्ममर्यादांचे रक्षण करण्यास समर्थ होईल. - स्वामी प्रणवानंद
३
आपल्या मनात जर ही दृढ धारणा असेल की हे राष्ट्र आपले आहे, इथे आपलेच राष्ट्र जीवन आहे. हे राष्ट्रजीवन श्रेष्ठ आणि संपन्न बनविण्याची जबाबदारी आपली आहे. ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी केवळ आजच्याच गोष्टीकडे लक्ष न देता चिरंतन स्वरूपात प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात राष्ट्रभावना निर्माण करण्याच्या हेतूने एक सुव्यवस्थित व राष्ट्रीय कल्पनेने प्रभावित असे कार्य उभे केले पाहिजे.
४
आम्हाला आपला हा हिंदुसमाज इतका सुसंघटित आणि शक्तिशाली बनवायचा आहे की, इतर समाजाच्या मनात हिंदुंबद्दल अगदी पाहता क्षणी आदर उत्पन्न झाला पाहिजे. येथे साध्य व साधन एकरूप आहेत. संघटन हेच साध्य व संघटन हेच साधन. सुसंघटित असणे हीच प्रत्येक जिवंत समाजाची स्वाभाविक अवस्था असते. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही काळात सुसंघटित असणे आवश्यकच असते. केवळ सुसंघटित समाजच आपल्या सगळ्या समस्या यशस्वी रीतीने उलगडू शकतो हे आम्ही विसरता कामा नये.